Saturday, May 23, 2020

गिरगांव ! आमचं गांव !!



आनंद परशुराम बिरजे (यांनि लिहिलेल पोष्ट).
१४ एप्रिल २०२०

गिरगांव ! आमचं गांव !!


वेद आणि पुराणांत कल्पवृक्षाचा उल्लेख आहे. कल्पवृक्ष हा स्वर्गातील एक विशेष वृक्ष आहे. पुराणानुसार समुद्र मंथनाच्या १४ रत्नांपैकी एक कल्पवृक्ष देखील होता. पौराणिक शास्त्र आणि हिंदू मान्यतेनुसार असे मानले जाते की या झाडाखाली बसलेल्या माणसाला जे काही हवे आहे ते पूर्ण होते. आमचा "गिरगांव" पण ह्या "कल्पवृक्षा" सारखाच आहे.

जो जे वांछील,
तो ते लाहो प्राणीजात !

दक्षिण मुंबईत कुलाब्यापासून सुरवात केल्यास गिरगांवातच आपल्याला दाट वस्ती आढळते. लौकिकार्थाने मुंबई-२ म्हणजेच ठाकूरद्वार नाका संपला आणि सिग्नल पार केला की आमचा गिरगांव सुरू होतो. परंतु खरं पहायला गेलं तर झावबा वाडी, धस वाडी, कामत चाळी येथूनच गिरगांवच्या खाणाखुणा दिसू लागतात.

सुशिक्षित मध्यमवर्गीय ही गिरगांवची खासियत !  पूर्वीच्या काळी समुद्र केळेवाडीतील साहित्य संघ मंदिर नाट्यगृहापर्यंत होता.  कोळी, भंडारी, पाठारे प्रभू, सीकेपी हे इथले मूळ रहिवासी‌. ह्या भूभागाच्या जवळच एक टेकडी होती. ह्यांची गुरढोरं ह्या टेकडीवर "चरणी" ला जायची. ह्या टेकडीच्या म्हणजेच गिरीच्या पायथ्याशी वसलेलं गांव म्हणून सर्वसामान्य माणसं त्याला गिरीग्राम म्हणू लागले. ह्या गिरीग्राम चा अपभ्रंश होऊन त्याचं नांव झालं गिरगांव ! 

समुद्राला भराव घालून ब्रिटिशांनी थेट कुलाब्यापर्यंत रेल्वे नेली आणि जिथे गुरेढोरे चरणीला जात होती तेथे रेल्वे स्थानक बांधून त्याचं नांव ठेवलं चर्नी रोड !

 अशी एकही गोष्ट नाही जी आम्हां गिरगांवकरांना ५ मिनिटांत मिळत नाही. सर्व काही हाताशी उपलब्ध !
कल्पवृक्षाप्रमाणे !

 काही लोक गंमतीने म्हणतात की गिरगांवातील कुत्रा शेपटी आडवी हलवित नाही तर उभी हलवतो; कारण शेपटी आडवी हलवायला गिरगांवात मोकळी जागाच नाही. आम्ही गिरगांवकर छोट्याशा चाळींत राहतोय पण आमची हृदये विशाल आहेत, सर्वसमावेशक आहेत.

तसं पहायला गेलं तर मला नेहमी वाटतं की आमचा गिरगांव म्हणजे स्वत:तच एक भारत आहे. माझा मित्र व सुप्रसिद्ध निवेदक, गप्पाष्टककार श्री संजय उपाध्ये म्हणतात की
टाकसाळीत नाण्यांचे,
राजधानीत राण्यांचे,
संगीतात गाण्यांचे आणि
गिरगांवात पाण्याचे स्थानच वेगळे !

होय ! पाणी हा आमच्या अती जिव्हाळ्याचा विषय ! परंतु गेल्या काही वर्षांत सुबत्ता आल्यामुळे तसेच महानगर पालिकेच्या सहकार्यामुळे आमच्या गिरगांवातील पाण्याचे दुर्भिक्ष्य संपले आहे.


गिरगांव म्हणजे उत्सव,
गिरगांव म्हणजे उत्साह,
गिरगांव म्हणजे चैतन्य !

प्रत्येक उत्सव जल्लोषात साजरा करावा तर गिरगांवकरांनी. गोविंदाची तयारी रक्षाबंधनापासून सुरु होते. थरावर थर रचून आखणी परफेक्ट केली जाते. डोंगरी, उमरखाडी, मांडवी कोळीवाडा, कुंभार वाडा, सुतार गल्ली, फणसवाडी, अखिल मुगभाट, शिवसेना शाखा, झावबा वाडी, खेतवाडी यांचे चित्ररथ पाहण्यासाठी व त्यांच्या गोविंदांनी हंडी फोडल्यावर कच्छीवर "ढाकूमाकूम ठाकूमाकूम" नाचणाऱ्या गिरगांवकरांचा उत्साह पाहत रहावा. त्यात ती कच्छी वाजवणारे शशी पोंक्षे, विजय (विजू) चव्हाण, इब्राहिम, पुर्शा साळुंके, गजानन साळुंके असतील तर मग बघायलाच नको. उगीच नाही "ब्लफ मास्टर" चित्रपटातील "गोविंदा आला रे आला" हे शम्मी कपूरवर चित्रीत झालेलं गोविंदाचं गाणं चित्रित करायला संगीतकार कल्याणजी-आनंदजींना तसेच दिग्दर्शक मनमोहन देसाईंना (हे खेतवाडीत रहात) गिरगांवातील बोरभाट लेन निवडावीशी वाटली यात गैर काय ?

परिस्थिती यथातथा असली तरी जातीचा गिरगांवकर स्वत:ला त्या परिस्थितीशी अ‍ॅडजस्ट करून घेतोच. घार हिंडते आकाशी लक्ष तिचे पिलापाशी या उक्ती प्रमाणे गुढीपाडव्याची नववर्ष स्वागत यात्रा, शिवजयंती, गोविंदा,
गणपती उत्सव, संक्रांत,  होळी इत्यादींचे निमित्त करून बाहेरगावी वास्तव्यास असलेला मूळ गिरगांवकर आपल्या गिरगांवात झाडी मारणारच. इथला कोलाहलही हवाहवासा वाटणारा. एका दिवसासाठी का होईना पण गिरगांवात येऊन हवीहवीशी वाटणारी एनर्जी घेऊन तो माघारी परतणार. पुढच्या सणाला परत येण्यासाठी.

शिक्षण, खेळ, साहित्य, संगीत, नाट्य, व्यवसाय, आयोजन, इ. प्रत्येक क्षेत्रात आम्ही गिरगांवकर अग्रेसर आहोत. चला तर मग !
आमच्या गिरगांवच्या सफरीवर !

प्रत्येक दोन मिनिटांवर एक वाडी म्हणजे आमचं गिरगांव ! वैद्य वाडी, चंपा वाडी (स्वामी समर्थ नगर), उरणकर वाडी, भूताची वाडी, पिंपळ वाडी, शेणवी वाडी, काकड वाडी, नारायण वाडी, कांदे वाडी, आंग्रे वाडी, अमर वाडी, अमृत वाडी, भट वाडी, खटाव वाडी, खोताची वाडी, कुडाळदेशकर वाडी, आंबे वाडी, परशुराम वाडी, गाय वाडी, केळे वाडी, मांगल वाडी, गोमांतक वाडी, ओवळ वाडी, तेली वाडी, भिमराव वाडी, जिंतेकर वाडी, फणस वाडी, धोबी वाडी, झावबा वाडी, धस वाडी, करेल वाडी, हेमराज वाडी, एक ना अनेक !

फार पूर्वी म्हणजे आमच्या लहानपणी गिरगांवात दादागिरी फार असायची. दगड, सोडावॉटरच्या बाटल्या, स्टम्प्स, चाकू, सुरे आणि फारफार तर गुप्ती ही त्याकाळची प्रचलित शस्त्रे. पिंपळवाडीतील गणपत (जावकर) दादा आणि मुगभाटात हातभट्टी लावणारा बाबू खोत ह्यांचं वैर जगजाहीर. महाभारत, रामायण सिरियल मध्ये दाखवितात तशा सोडावॉटरच्या बाटल्या आणि दगड भxxxx, मxxxx, आxxxxx अश्या जोरदार शिव्यांसहित अवकाशातून दळणवळण करायच्या. हाच प्रकार भूताची वाडी, धोबी वाडी, तेली वाडी, ओवळ वाडी, सरकारी तबेला (क्रांती नगर), मापला महाल, सूर्य महाल, अक्कलकोट लेन, यांच्या बाबतीत अधूनमधून असायचा. पण हे दादा लोक फार दिलदार असायचे. सिनेमातल्या "प्राण" सारखे. ह्यांचा आम्हां सामान्य गिरगांवकरांना उपद्रव नसे.

रात्र झाली की आम्ही पिंपळ वाडी, अमर वाडी किंवा मुगभाटात जाऊन कॅरम खेळायचो. नंतर प्रसिध्दीच्या झोतात आलेल्या अनेक कॅरमपटूंचा खेळ तेव्हां आम्ही फार जवळून पाहिलाय. कबड्डीचे सामने तेव्हां बहुत करून पिंपळ वाडी, मुगभाट क्रॉस लेन, झावबा वाडीत आणि सरकारी तबेल्यात (क्रांती नगर) व्हायचे. क्रिकेट सर्व गल्लीबोळांत झिरपले होते. प्रत्येक गल्लीत एक तरी क्रिकेट द्वेष्टा असायचाच. त्याच्या घरात बॉल गेल्यावर प्रसाद म्हणून दोन रबरी करवंट्या परत मिळायच्या.

विद्वान, व्यासंगी, वक्त्यांची कर्मभूमी म्हणजे आमचं गिरगांव ! मुगभाटचा नाका (व्हि पी बेडेकर चौक) आणि शांताराम चाळींचं विस्तिर्ण पटांगण ही आम्हां गिरगांवकरांसाठी तीर्थक्षेत्रच जणू !

लोकमान्य टिळक, बिपिनचंद्र पाल, लाला लजपत राय हे लाल-बाल-पाल, पै महम्मद अली, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, बॅरिस्टर बाबासाहेब जयकर, बॅरिस्टर महम्मद जिना, भारतरत्न स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, अ‍ॅनी बेझंट, मौलाना शौकत अली, कर्तारसिंग थत्ते यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या शांतारामांच्या चाळीच्या पटांगणाचे (सध्याचे बेडेकर सदन) भाग्य काय वर्णावे ?

मुंबईतील पहिल्या गणेशोत्सवाचा प्रारंभ प्रामुख्याने सारस्वत आणि ब्राम्हणांची वस्ती असलेल्या शांतारामांच्या चाळीत सन १८९४ साली झाल्याचे जुन्या कागदपत्रांवरून आढळते. श्री ज. स. करंदीकर यांनी संपादित केलेल्या श्री गणेशोत्सवाची ६० वर्षे या ग्रंथात "मुंबईतील गणेशोत्सव" या प्रकरणात पृष्ठ क्रमांक १५० वर सन १८९५ सालच्या सदरात कै शांताराम नारायण वकील यांच्या चाळीत डॉ मो. गो. देशमुख यांच्या सुचनेप्रमाणे सर्व मेळेवाल्यांचे भजन झाले. आट्यापाट्यांचे खेळ झाले असा उल्लेख आढळतो. सन १८९७ मध्ये प्लेगच्या साथीमुळे हा गणेशोत्सव खंडीत झाला. त्यानंतर १६ सप्टेंबर १९०१ रोजी साक्षात लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी स्वहस्ते शांतारामांच्या चाळीत येऊन गणेश मूर्तीची स्थापना केली व चाळींच्या पटांगणात जाहीर सभा घेऊन आपले मन मोकळे केले.

संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात आमच्या गिरगांवातील मुगभाटचा नाका हा सेंटर ऑफ अ‍ॅट्रॅक्शन होता. आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांची मुलुख मैदान तोफ येथूनच धडधडत असे. सोबत एस एम जोशी, प्रबोधनकार ठाकरे, हेही घणाघात करीत.

याच मुगभाटच्या नाक्यावर "द्वारकानाथ ब्लॉक मेकर्स" म्हणून एक प्रख्यात जागा आहे. तेथे एक व्यंगचित्रकार आपल्या उमेदीच्या काळात व्यंगचित्रे रेखाटीत असायचा. त्यानंतर केवळ गिरगांवच नव्हे तर संपूर्ण जग त्या व्यंगचित्रकाराला हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे या नांवाने ओळखू लागले.

सोमेश्वर गोखले, प्रमोद नवलकर, जयवंतीबेन मेहता, चंद्रशेखर प्रभू, चंद्रकांत पडवळ, विलास अवचट, अरुण चाफेकर, दिलीप नाईक, सुरेंद्र बागलकर या लोक प्रतिनिधींनी गिरगांव विभागासाठी दखल घेण्याजोगे काम केले आहे.

प्रार्थना स्थळांची आमच्या गिरगांवात मांदियाळी आहे. फडके वाडीतील श्री गणपती मंदिरापासून सुरु होणारी भक्ती यात्रा शेजारील आम्ब्रोली चर्च, गिरगांव चर्च, पारसी अग्यारी, अक्कलकोट स्वामींचा मठ, संतीण बाईचा मठ, पंढरीनाथ देवालय, काळा राम मंदिर, गोरा राम मंदिर, झावबा श्रीराम मंदिर, दत्त मंदिर, हनुमान मंदिर, व्हि पी रोड पोलीस स्टेशन जवळील शंकराचं मंदिर, मांगल वाडीतील मशीद, अशी समाप्त होते. हल्ली यात  देरासरांची होणारी बेसुमार वाढ मात्र अनाकलनीय आहे.

कुशाग्र बुध्दी आणि गिरगांवकर हे देखील एक अद्वैत आहे.

हळद, बासमती तांदूळ इ. च्या पेटंटची लढाई आंतरराष्ट्रीय पातळीवर यशस्वीपणे लढणारे सुप्रसिद्ध शास्रज्ञ डॉ रघुनाथ माशेलकर हे युनियन हायस्कूलचे विद्यार्थी, शास्रज्ञ डॉ माणिक भाटकी हे शांताराम चाळीतील रहिवासी, अ‍ॅडमिरल जयंत नाडकर्णी तसेच त्यांचे बंधू सुप्रसिद्ध साहित्यिक ज्ञानेश्वर नाडकर्णी, माजी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त श्री द म सुकथनकर हे सर्व चिकित्सकचे विद्यार्थी तर ज्येष्ठ सनदी अधिकारी बी एन आडारकर (ह्यांची सही एक रुपयाच्या नोटेवर आहे) शांताराम चाळीतील रहिवासी. कविवर्य मंगेश पाडगांवकर हे शांताराम चाळीतील ज्या खोली क्रमांक ३३ मध्ये रहात तेथे त्यांच्याच कृपेमुळे मी आज माझ्या कुटुंबियांसोबत राहतो. कविवर्य आरती प्रभू उर्फ चिं त्र्यं खानोलकर कुडाळ देशकर वाडीत रहात तर ज्येष्ठ किर्तनकार ह.भ.प. बाबामहाराज सातारकर कांदेवाडीतील त्यांच्याच मालकीच्या दादा महाराज वाडीत राहतात. शांताराम चाळीत राहणाऱ्या श्री भास्कर गोळे तसेच श्री मुळेकर यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे हायड्रॉलिक इंजिनिअर हे प्रतिष्ठेचे पद भूषविले. श्री मुळेकर यांनी नंतर पालिकेचे उपायुक्त पद ही भूषविले. कांदे वाडीच्या नाक्यावरील श्री अक्कलकोट स्वामींच्या मठाच्या वास्तूची मालकीही ह्याच मुळेकर कुटुंबियांकडे आहे.

शांताराम चाळ ही अनेक दृष्टीने वैशिष्ट्यपूर्ण आहे. ह्या चाळीचे मालक श्री भालचंद्र सुकथनकर यांनी लोकमान्य टिळकांच्या गीतारहस्य ग्रंथाचं इंग्रजीत भाषांतर केलं तर त्यांचे बंधू श्री विष्णू सीताराम सुकथनकर हे महाभारतावरील टीकात्मक ग्रंथासाठी जगभर प्रसिध्द आहेत. चाळीच्या मालकीणबाई डॉ सौ मालिनी सुकथनकर (मालिनी ब्लॉक्स) ह्यांचा दवाखाना चाळीच्या तळमजल्यावर होता. त्या नगरसेविका होत्या. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या इतिहासात शिक्षण समितीच्या पहिल्या महिला अध्यक्षपदाचा मान त्यांच्याकडे जातो.

वेदशास्त्रसंपन्न सर्वश्री काशिनाथ वामन लेले, लक्ष्मणशास्त्री विद्वांस, कान्हेरेशास्त्री इत्यादींनी पुराणे कथन करुन तर डॉ सांबारे, प्रो. शि. म. परांजपे, प्रो वि. गो विजापूरकर, बाबासाहेब खरे इत्यादींनी आपल्या व्याख्यानांतून स्वातंत्र्याचा प्रसार करून जनजागरण केले. इतकेच नव्हे तर सन १९०८ सालच्या गणेशोत्सवात सौ सरला चौधरी यांनी वंदे मातरम् हे राष्ट्रगीत प्थम म्हटल्याचा उल्लेख आढळतो.


स्वातंत्र्ययोध्यांनी या शांताराम चाळींच्या पटांगणाचा उपयोग ब्रिटिशांविरुद्ध भारतीय जनतेत क्रोध, त्वेष निर्माण करून त्यांना स्वातंत्र्य युद्धासाठी उद्युक्त करण्यासाठी केला.  याबरोबरच परमपूज्य संत गाडगे महाराज, चौडे बुवा इत्यादींनी किर्तनाच्या माध्यमातून सामाजिक चळवळ उभारून जनजागृती घडविली. नारायण महाराज केडगांवकर यांनी याच शांताराम चाळीच्या पटांगणात सत्यनारायण समारंभ प्रारंभ केला.

शांताराम चाळींची मालकी सन १९४३ ते १९५७ या कालावधीत सुप्रसिद्ध उद्योगपती मेसर्स व्हि पी बेडेकर अ‍ॅण्ड सन्स चे मालक श्री वासुदेव विश्वनाथ बेडेकर यांच्याकडे आली. बेडेकर सदन क्र १० च्या तळमजल्यावर राहणाऱ्या श्रीमती काशीताई मायदेव ह्यांच्याकडे सुप्रसिद्ध राष्ट्रीय किर्तनकार ह भ प आफळे बुवा तसेच कोपरकर बुवा यांचे वास्तव्य असे. कोपरकर बुवांच्या पुढाकाराने ह्या वाडीत दासनवमीचा उत्सव जोशात साजरा करण्यात येत असे. गेली अनेक वर्षे संपूर्ण बेडेकर कुटुंबियांच्या पुढाकाराने मार्गशीर्ष महोत्सव तसेच व्यासपीठ या उपक्रमांअंतर्गत समाज प्रबोधनाचं काम अव्याहतपणे होत आहे.

श्री कृष्णाजी गोपाळ उर्फ किसनराव छत्रे हे सुमारे ९०+ वयाचे नौजवान ! आपली रेल्वेमधील अधिकारी म्हणून सेवा बजावत असतानाच युनियन तसेच नाना पालकर स्मृतीत डोंगराएव्हढं समाजकार्य करणारे. पदरचे पैसे खर्च करून. गिरगांवातून  व्हि टी ला जायचे असो की परेलच्या नाना पालकर स्मृतीत. सदैव चालत जाणार. अक्षर इतकं सुरेख की मोत्याचे दाणे. ज्ञानेश्वरी, तुकारामगाथा, दासबोध, इ. ग्रंथ स्वहस्ताक्षरात लिहिणारे किसनराव छत्रे म्हणजे एक सुखद आश्चर्यच आहेत !

आज जिथे आराम ज्युस सेंटर आहे त्या इमारतीत सुप्रसिद्ध रहस्यकथा लेखक श्री बाबुराव अर्नाळकर यांचं वास्तव्य होतं. तर खत्तर गल्लीत सुप्रसिद्ध लेखक नाथ माधव यांचं वास्तव्य होतं. सुप्रसिद्ध नाटककार श्री कृष्णाजी प्रभाकर उर्फ कृ प्र खाडिलकर, अग्रलेखांचा बादशहा श्री निळकंठ खाडिलकर हे शेणवी वाडीत रहायचे. पु ल देशपांडे हे गिरगांवचे जावई होते असं म्हटलं तर कुणाचा विश्वास बसणार नाही. पण ते खरं आहे. पु ल उर्फ भाईंची पहिली पत्नी माधवदास प्रेमजी चाळीतील दिवाडकरांची मुलगी. पण ती अल्पायुषी ठरली. लग्नानंतर काही महिन्यांतच तिचं निधन झालं.

संगीत आणि गिरगांवकर हे अजून एक अद्वैत ! मुगभाटच्या नाक्यावरील कॉर्नरच्या इमारतीतील दुसऱ्या मजल्यावर पूर्वी त्रिनिटी क्लब होता. संपूर्ण हिंदुस्थानात हा क्लब फेमस होता. त्याकाळचा हिंदूस्थानातील असा एकही शास्त्रीय गायक-वादक नाही ज्याने या त्रिनिटी क्लबमध्ये आपली कला पेश केली नाही. ह्या रस्त्याचं नांवच मुळी पं भास्कर बुवा बखले पथ आहे. सुप्रसिद्ध ज्येष्ठ संगीतकार दत्ता डावजेकर उर्फ डीडी, त्यांची मुलगी नामवंत पार्श्वगायिका रेखा डावजेकर उर्फ डॉ अपर्णा मयेकर भिमराव वाडीत रहात.

डीडींचे जावई व ज्येष्ठ सतार वादक श्री अरविंद मयेकर हे खेतवाडीत रहात.

जुन्या काळातील सुप्रसिद्ध गायक नट श्री अनंत दामले आर्यन शाळेसमोर रहात‌. त्यांचं नैपुण्य पाहून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्यांना "नुतन पेंढारकर" ही उपाधी दिली.

सुप्रसिद्ध संगीतकार श्री सुधीर फडके उर्फ बाबूजी अक्कलकोट लेन मध्ये रहायचे तर त्यांच्या शेजारच्या खोलीत संगीतकार श्री अशोक पत्की रहात. ज्येष्ठ संगीतकार श्री यशवंत देव आंग्रे वाडीतील हिंद विद्यालय शाळेचे विद्यार्थी, तर ज्येष्ठ संतूर वादक पं उल्हास बापट हे व्हि पी रोड पोलिस वसाहतीत लहानाचे मोठे झाले. संगीतकार श्री विश्वनाथ मोरे हे पै मॅटर्निटी हॉस्पिटल जवळ रहात तर सुप्रसिद्ध हिंदी संगीतकार कल्याणजी, आनंदजी, बाबला, कंचन हे कुटुंबिय मांगल वाडीत धुम्मा हाऊसमध्ये रहात. सुप्रसिद्ध क्लेरोनेट वादक श्री प्रभाकर भोसले हे सन्मित्र बॅंकेच्या खाली एका छोट्याशा खोलीत रहात तर त्यांचे जावई सुप्रसिद्ध शहनाई वादक श्री मधुकर धुमाळ हे पै हॉस्पिटल शेजारील बिल्डिंग मध्ये रहात. मुगभाटातील शालवाला बिल्डिंग मध्ये "माती सांगे कुंभाराला, पायी मज तुडविसी" फेम सुप्रसिद्ध गायक-संगीतकार गोविंद पोवळे गायनाचा क्लास चालवीत. नामवंत तबला वादक श्री जगदिश मयेकर हे करीम बिल्डिंग मध्ये रहात. सुप्रसिद्ध संगीत संयोजक श्री अजय मदन, श्री प्रशांत लळीत आणि श्री अमित गोठीवरेकर हे अनुक्रमे सरकारी तबेला,  माधवदास प्रेमजी चाळ आणि बेडेकर सदन मधील रहिवासी.

गिरगांवातल्या पिंपळ वाडीत लिमये मास्तर रहायचे. सदैव धोतर सदऱ्यात असायचे. ते विविध सुरांच्या मधुर बांसऱ्या बनवायचे. देश-विदेशांतून संगीत क्षेत्रातील अनेक मान्यवर त्यांच्याकडून बांसऱ्या बनवून घ्यायचे. यांत फिरंगी जास्त असायचे.

उरणकर वाडीच्या नाक्यावर डॉ प्रकाश जोशी यांचा दवाखाना आहे. ह्या डॉ प्रकाश जोशींकडे जुन्या हिंदी-मराठी दूर्मिळ गीतांचा खजाना आहे. ह्यांचा हिंदी चित्रपट संगीताचा व्यासंग इतका दांडगा आहे की अनेक प्रतिष्ठित संगीतप्रेमी यांच्या दवाखान्यात उपस्थितीत असतात. डॉ प्रकाश जोशींचा मुलगा डॉ राहुल हा गायक आहे. रणबीर कपूर याने केलेल्या एका पेंटच्या (बरखा जा...) जाहिरातीतील आवाज डॉ राहुल जोशी याचा आहे.

नाट्यदर्पण प्रतिष्ठान आणि चतुरंग प्रतिष्ठान ह्या गिरगांवने महाराष्ट्राला आणि पर्यायाने मराठी माणसाला दिलेला एक अनमोल ठेवा आहे. चतुरंगच्या विद्याधर निमकरांनी माधवाश्रमाच्या इमारतीत रुजवलेल्या ह्या रोपटृयाचं पाहता पाहता वटवृक्षात रुपांतर झालं. नाट्यदर्पणच्या सुधीर दामलेंनी कोना रेस्टॉरंट शेजारील आपल्या कार्यालयात नाट्यविषयक अनेक उत्तमोत्तम दर्जेदार कार्यक्रमांची आखणी केली व त्यांची यशस्वीपणे अंमलबजावणी केली. नाट्यदर्पण रजनी आणि नाट्यदर्पण विशेषांक ही त्याचीच काही उदाहरणे.

गिरगांव ही अभिनेता, अभिनेत्री, गायक, गायिका, दिग्दर्शक, निवेदक यांची खाण आहे. सुप्रसिद्ध हिंदी अभिनेता आणि पहिला सुपरस्टार राजेश खन्ना सरस्वती बिल्डिंग मध्ये रहायचा तर जंपिंग जॅक जितेंद्र श्याम सदन मध्ये रहायचा. ज्येष्ठ अभिनेत्री नलिनी सराफ उर्फ सीमा देव भट वाडीत रहायची. कुंभार वाड्यात राहणारा लक्ष्मीकांत बेर्डे साहित्य संघ मंदिर नाट्यगृहात नोकरी करता करता आपल्या अंगभूत गुणांवर विनोदी अभिनेता म्हणून अजरामर झाला. नटसम्राट प्रभाकर पणशीकर आंग्रे वाडीत, नटश्रेष्ठ दाजी भाटवडेकर भाटवडेकर वाडीत, सोम्याला "कोंबडीच्या" म्हणणारे ज्येष्ठ अभिनेते  रवी पटवर्धन माधवदास प्रेमजी चाळीत, खोताच्या वाडीतील दत्त मंदिराच्या आवारात गणेश सोळंकी, जयंत सावरकर, सुष्मा सावरकर, सतिश सलागरे, चिकित्सक शाळे शेजारी, नयन भडभडे, रिमा भडभडे-लागू, उर्मिला मातोंडकर हे कुडाळ देशकर वाडीत, चन्ना रूपारेल मापला महाल मध्ये, अतुल काळे उरणकर वाडीत, जयराम हर्डिकर मुगभाटातील नरेंद्र सदन मध्ये, स्वप्निल जोशी तसेच प्रदिप पटवर्धन झावबा वाडीत, All The Best फेम देवेंद्र पेम कामत चाळीत रहायचे.

सुप्रसिद्ध पार्श्वगायिका श्रीमती सुलोचना चव्हाण आजही कोळी वाडीत वास्तव्य करून आहेत. नामवंत गायिका प्रमिला दातार मापला महाल मध्ये रहायच्या.

गिरगांव अनेक ऐतिहासिक वास्तूंसाठी सुप्रसिद्ध आहे. भारतातील पहिला बोलपट अर्देशिर इराणी दिग्दर्शित "आलम आरा"  १४ मार्च १९३१ रोजी आमच्या गिरगांवातील "मॅजेस्टिक" टॉकीज मध्ये लागला. गिरगांवात मनोरंजनासाठी मॅजेस्टिक, सेंट्रल, रॉक्सी, इंपिरियल, ड्रिमलॅंड, नाझ, सिल्व्हर, अलंकार इत्यादी टॉकीज बरोबरच साहित्य संघ मंदिर (मराठी नाटके), हिंदुजा ऑडिटोरीयम (गुजराती नाटके), बिर्ला क्रिडा केंद्र (गुजराती-हिंदी) अशी रेलचेल आहे. मराठी नाट्य चळवळीसाठी आणि जोपासनेसाठी डॉ अनंत भालेराव आणि डॉ बाळ भालेराव या पिता-पुत्रांचा उल्लेख अनिवार्य आहे. गोवा हिंदू असोसिएशन, मुंबई मराठी साहित्य संघ मंदिर,  नटसम्राट प्रभाकर पणशीकरांची "नाट्यसंपदा", सुधा करमरकरांची बालरंगभूमी इत्यादींनी मराठी नाट्यसृष्टी समृध्द केली.

बुक डेपो आणि प्रकाशन गृहे यांचं गिरगांव म्हणजे आगरच ! लाखाणी बुक डेपो, विद्यार्थी बुक डेपो, स्टुडंट्स बुक डेपो, बॉम्बे बुक डेपो यांनी आम्हां गिरगांवातील मुलांची नेहमीच काळजी घेतली. खटाव वाडीतील मौज प्रकाशन हा नामवंत साहित्यिकांचा अड्डाच असे. मॅजेस्टिक प्रकाशन, त्रिदल प्रकाशन, पॉप्युलर प्रकाशन, ग का रायकर प्रकाशन, कॉंटीनेंटल प्रकाशन, केशव भिकाजी ढवळे प्रकाशन, परचुरे प्रकाशन, डिम्पल प्रकाशन, जीवनदीप प्रकाशन ह्या नावाजलेल्या प्रकाशन संस्थांनी आम्हां गिरगांवकरांत वाचनसंस्कृती रुजविली.

खाद्यप्रेमींसाठी गिरगांव सारखी जागा शोधून सापडणार नाही. गिरगांव चर्च समोरील विनायक केशव आणि कंपनी, मॅजेस्टिक जवळील राजा रिफ्रेशमेंट, गोल्डनव्हिल, समोरील वीरकर आहार भुवन, खोताच्या वाडीतील मत्स्यप्रेमींसाठी जगप्रसिद्ध असलेले खडप्यांचे अनंताश्रम, शेजारील कोना रेस्टॉरंट, खरवस स्पेशल मॉडर्न, गोविंदाश्रम, सत्कार, क्षुधा शांती भवन, सावरकरांचे प्रल्हाद भुवन, टेंब्यांचे विनय हेल्थ होम, मुगभाटातील कामत, विष्णू भिकाजी हॉटेल, पुरणपोळी हाऊस, बोरकरचा वडा, ताराबागेतली पाणीपुरी, माधवाश्रम, कोल्हापूरी चिवडा, सांडू, पणशीकर, आयडियल मिठाई, दत्त मंदिर समोरील नाफडे, फडके वाडी समोरील प्रकाश, खोताच्या वाडीतील आयडियल वेफर्स, मोणपारा फरसाण, कुलकर्णी भजीवाले, नित्यानंद, व्हॉइस ऑफ इंडिया, सनशाईन, गोमांतक बेकरी, याझधानी बेकरी, आर्य गणेश बेकरी इत्यादींनी आम्हां गिरगांवकरांच्या जिभेचे चोचले वर्षानुवर्षे पुरविले. तहान भागवण्यासाठी प्रकाश कोल्ड्रिंक, आराम ज्युस सेंटर होतेच.

खरेदीसाठी आम्हां गिरगांवकरांना श्रीधर भालचंद्र आणि कंपनी, समोरील मॉडर्न, गिरगांव पंचे डेपो, रामचंद्र केशव आणि कंपनी, वामन हरि पेठे, हरि केशव गोखले, वैद्य, व्हि पी बेडेकर मसालेवाले, कुबल मसाले, ठाकुरदेसाई, नानिवडेकर, गुर्जर गोडबोले आणि कंपनी, बि ए तारकर निर्भय स्टोव्ह, समर्थ वॉच कंपनी, अॅक्मे वॉच कंपनी, बाबुभाई जगजिवनदास, खाडे चप्पल मार्ट, इत्यादी मुबलक पर्याय असायचे.

घरात काही मंगल कार्य असलं की पावलं आपसूक कांदेवाडीतील पत्रिकांच्या दुकानांत नाहीतर ब्राह्मण सभा, चित्तपावन, मोरार बाग, लक्ष्मी बाग, विष्णू बाग, कोकणस्थ वैश्य समाज हॉल, शांती निवास, धरमसिंह हॉल, संतीण बाईचा मठ, नारायण वाडी इत्यादी ठिकाणी चौकशीसाठी वळायची.

व्हि पी रोड पोलिस स्टेशन, कांदे वाडी पोलिस चौकी, गिरगांव पोस्ट ऑफिस, गव्हर्नमेंट प्रिंटींग प्रेस, सावित्रीबाई फुले महिला छात्रालय, जवाहर बालभवन, कैवल्यधाम, तारापोरवाला मत्स्यालय, मफतलाल बाथ, राणीचा कंठहार (Queen's Necklace), लोकमान्यांचं स्मृतीस्थळ, गिरगांव चौपाटी, गिरगांव कोर्ट ह्या केवळ वास्तू नव्हेत तर जीवंत कहाण्या आहेत. मोकाशी, वाकटकरांसारखे डेरींगबाज पोलिस अधिकारी, अ‍ॅड. अधिक शिरोडकरांसारखा निष्णात कायदेतज्ञ, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी विदेशातून पुस्तकात लपवून पाठविलेल्या पिस्तूलाची "डिलिव्हरी" घेणारे केशवजी नाईकांच्या चाळीतील पाटणकर, संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातील पहिला हुतात्मा बंडू गोखले, संपूर्ण जग बुध्दीबळात पादाक्रांत करणाऱ्या जयश्री-रोहिणी-वासंती या खाडिलकर भगिनी आणि स्नूकर-बिलियर्ड्समध्ये विश्वविजेते पद मिळविणाऱ्या मिनल-अनुजा ह्या ठाकूर भगिनी, गणेश मूर्तीकार मादूस्कर आणि पाटकर, फ्लोरा फाऊंटन आणि हुतात्मा चौकाचा आराखडा करणारे क्रांतीनगर मधील नामवंत आर्किटेक्ट श्री प्रविण काटवी, श्रीकृष्णानंतर वस्त्रपुरवठ्यातील एकमेव सुरेश ड्रेसवाला (औंधकर) ही माणसे नव्हेत तर संस्था आहेत. एव्हढेच कशाला, गिरगांव कोर्टात अभिनयसम्राट दिलीप कुमारने सन्माननीय न्यायाधिशांसमोर आपले मधुबालावर निरतिशय प्रेम होते व आहे अशी साक्ष दिली होती.

मी तीन वर्षे मुंबई बाहेर पश्चिम भारतात ऑडिट साठी डेप्यूटेशनवर होतो. तेथली शांतता खायला उठायची. एखाद दुसरी सुट्टी टाकून मुंबईची मिळेल ती ट्रेन पकडायचो. मुंबई सेंट्रल स्टेशनवर ट्रेन थांबली की सामान कमी असूनही ६६ नंबर ची वाट न पाहता समोर दिसेल ती टॅक्सी पकडून घरी निघायचो. गिरगांव चर्च, मॅजेस्टिक पाहिलं की माणसांत आल्यासारखं वाटायचं.

शेवटी आपलं गिरगांव ते आपलं गिरगांव !

संत तुकडोजी महाराजांच्या शब्दांतच सांगायचं तर

महाली मऊ बिछाने
कंदील शामदाने
आम्हां जमिन माने,
या गिरगांवात माझ्या !

मला ओळखलंत ? होय, होय ! मी तोच ! "पुष्पक" चित्रपटातला 'कमला हसन' ! कोलाहलाचा आवाज रेकॉर्ड करुन टेप रेकॉर्डर कानाशी लावून झोपणारा ! एक तृप्त गिरगांवकर !


आनंद परशुराम बिरजे
१४ एप्रिल २०२०

No comments:

Post a Comment