Monday, October 12, 2026

पदवी ज्ञानाचा पुरावा असू शकते, पण अनुभव हे ज्ञानाचं मूळ असतं

*अनुभव-...*_

_लेखक - अज्ञात._

      त्या पावसाळी रात्री कोट्याधीश उद्योगपतीची एकुलती एक मुलगी ऑपरेशन थिएटरमध्ये जीवन-मरणाच्या सीमारेषेवर झुंज देत होती. बाहेर प्रसार माध्यमांच्या गाड्यांची रांग लागली होती, पण आत एका वृद्ध सुरक्षा रक्षकाचे शब्द ऐकायला कुणाकडे वेळ नव्हता... 
     पुण्यातील नामांकित "आरोग्यम मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल"च्या सातव्या मजल्यावर एकच गोंधळ उडाला होता. ऑपरेशन थिएटरच्या बाहेर उभे होते देशातील प्रसिद्ध उद्योगपती राघव देशमुख. कोट्यावधींचे साम्राज्य उभे करणारा तो माणूस त्या रात्री पूर्णपणे हतबल दिसत होता. आत त्याची २८ वर्षांची मुलगी अन्विता आयुष्यातील सर्वात मोठी लढाई लढत होती.
      अन्विता आठ महिन्यांची गर्भवती होती. अचानक तिला तीव्र वेदना सुरू झाल्या आणि तिला तातडीने हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. तपासणीनंतर डॉक्टरांनी सांगितले - "बाळाची नाळ गळ्याभोवती अडकली आहे. आई आणि बाळ दोघांच्याही जीवाला धोका आहे."
      देशातील नामांकित तज्ज्ञ डॉक्टरांना बोलावण्यात आले. एक नाही... दोन नाही... पूर्ण नऊ तज्ज्ञ डॉक्टर! पण प्रत्येक नवीन रिपोर्ट आधीपेक्षा अधिक चिंताजनक होता.
     "ब्लड प्रेशर कमी होत आहे."
      "बाळाला ऑक्सिजन कमी मिळतोय."
     "आता जास्त वेळ थांबता येणार नाही."
       संपूर्ण टीम तणावाखाली होती. त्याच वेळी हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये ६८ वर्षांचे सुरक्षा रक्षक गणपत काका बसले होते.
पांढरी दाढी, वाकलेली पाठ आणि जुना चष्मा... गेली १५ वर्षे ते रात्रीची ड्युटी करत होते. सगळे त्यांना प्रेमाने "गणपत काका" म्हणत. 
     पण फार थोड्या लोकांना माहिती होतं की सुरक्षा रक्षक होण्यापूर्वी ते कोकणातील एका गावात प्रसिद्ध वैद्य होते. शरीरातील नसांचे ज्ञान, दाबबिंदू आणि पारंपरिक उपचारांची विद्या त्यांनी आपल्या वडिलांकडून शिकली होती. पण आधुनिक जगात त्यांच्याकडे ना पदवी होती, ना प्रमाणपत्र... म्हणून लोक त्यांना फक्त एक साधा सुरक्षा रक्षक समजत होते.
      अचानक एका नर्सचे शब्द त्यांच्या कानावर पडले- "बाळाची हृदयाची गती सतत कमी होत आहे!"
      गणपत काका सावध झाले.
      काही वेळाने दुसरी नर्स म्हणाली- "नाळ इतकी घट्ट अडकली आहे की बाळ खाली सरकत नाही."
      गणपत काकांच्या डोळ्यांसमोर ३५ वर्षांपूर्वीची एक घटना चमकून गेली. ते हळूहळू ऑपरेशन थिएटरकडे गेले. दाराजवळ उभ्या असलेल्या डॉक्टरांना त्यांनी नम्रपणे सांगितले - "मुलीला डाव्या कुशीवर ठेवू नका."
      डॉक्टर चकित झाले. "काय म्हणताय तुम्ही?"
      गणपत काका शांतपणे म्हणाले - "ज्या बाजूने नाळ दाबली जातेय, त्या बाजूचा भार वाढतोय. तिला दुसऱ्या बाजूला वळवा."
      डॉक्टरांचा चेहरा लाल झाला. "तुम्ही सुरक्षा रक्षक आहात की सर्जन?"
      आजूबाजूचे काही लोक हसू लागले. गणपत काका काहीच बोलले नाहीत. ते शांतपणे मागे फिरले. पण त्यांच्या चेहऱ्यावरची चिंता स्पष्ट दिसत होती.
      तेवढ्यात ऑपरेशन थिएटरचे दार उघडले. एक डॉक्टर धावत बाहेर आला. "आता तातडीने निर्णय घ्यावा लागेल. आई किंवा बाळ... दोघांपैकी एकालाच वाचवता येईल."
      हे ऐकताच राघव देशमुख यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांची पत्नी सुमन रडू लागली. पहिल्यांदाच त्या श्रीमंत कुटुंबाला जाणवलं की काही लढाया पैशाने जिंकता येत नाहीत.
      तेवढ्यात मागून एक शांत आवाज आला- "दोघांनाही वाचवता येईल."
      सगळ्यांनी मागे वळून पाहिले. ते गणपत काका होते.
      राघव चिडून म्हणाले, "तुम्ही इथे काय करताय?"
      गणपत काका शांतपणे म्हणाले, "बाळाला रस्ता नको आहे साहेब... त्याला श्वास हवा आहे."
      संपूर्ण कॉरिडॉर शांत झाला.
      गणपत काका पुढे म्हणाले, "माझं चुकलं तर मला लगेच बाहेर काढा. पण एकदा माझं ऐका."
     डॉक्टरांनी अनिच्छेने त्यांचा सल्ला मान्य केला. अन्विताची स्थिती बदलण्यात आली. सगळ्यांचे डोळे मॉनिटरवर खिळले होते.
    एक सेकंद...
    दोन सेकंद...
    पाच सेकंद...
    आणि अचानक बाळाची हृदयगती स्थिर होऊ लागली! एक नर्स आनंदाने ओरडली - "सर! हार्ट रेट वाढतोय!"
      डॉक्टर अवाक् झाले. तासन्तास न समजलेली गोष्ट एका वृद्ध सुरक्षा रक्षकाने ओळखली होती. त्यानंतर ऑपरेशन सुरू झाले. दीड तासाच्या तणावानंतर ऑपरेशन थिएटरचे दार उघडले.
नर्सच्या डोळ्यांत आनंदाश्रू होते.
"अभिनंदन! आई आणि बाळ दोघेही सुरक्षित आहेत."
     राघव देशमुख यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. काही वेळानंतर त्यांनी पहिला प्रश्न विचारला - "गणपत काका कुठे आहेत?"
      पण गणपत काका शांतपणे आपल्या जागेवर परत गेले होते. जणू काही घडलंच नव्हतं.
      दुसऱ्या दिवशी अन्विताला सर्व घटना सांगण्यात आली. तिने ताबडतोब म्हटले, "मला त्यांना भेटायचं आहे."
      गणपत काकांना बोलावण्यात आले. ते आत येताच अन्विताने आपल्या नवजात बाळाला त्यांच्या हातात दिले. गणपत काकांच्या डोळ्यांत पाणी आले. त्यांनी थरथरत्या हाताने बाळाच्या डोक्यावरून हात फिरवला.
     अन्विता म्हणाली, "आज माझं बाळ श्वास घेतंय, ते तुमच्यामुळे."
     गणपत काका हसले. "नाही ग बाळा, देवाने वाचवलं. मी तर फक्त निमित्त ठरलो."
      तेवढ्यात राघव देशमुख आत आले. काही क्षण ते गणपत काकांकडे पाहत राहिले. आणि अचानक... देशातील त्या मोठ्या उद्योगपतीने सर्वांसमोर वाकून गणपत काकांचे पाय स्पर्श केले. 
      संपूर्ण खोली स्तब्ध झाली. "मला माफ करा काका. काल मी तुम्हाला फक्त सुरक्षा रक्षक समजलो."
     गणपत काकांनी त्यांना उठवत म्हटलं, "बाळा, माणसाचं काम लहान-मोठं असू शकतं... पण त्याचा अनुभव कधीच लहान नसतो."
      हे शब्द प्रत्येकाच्या मनात घर करून गेले.
      काही दिवसांनी हॉस्पिटलमध्ये मोठा समारंभ आयोजित करण्यात आला. राघव देशमुख यांनी घोषणा केली की ग्रामीण वैद्यकीय ज्ञान आणि पारंपरिक अनुभवांवर संशोधन करणारे नवीन केंद्र सुरू करण्यात येईल.
      त्या केंद्राला नाव देण्यात आले- "गणपत प्रसाद मानव सेवा केंद्र" टाळ्यांच्या कडकडाटात गणपत काकांना मंचावर बोलावण्यात आले.
      त्यांनी माईक हातात घेतला आणि फक्त एवढंच म्हणाले—
"आयुष्याने मला एक गोष्ट शिकवली आहे. पदवी ज्ञानाचा पुरावा असू शकते, पण अनुभव हे ज्ञानाचं मूळ असतं. ज्या दिवशी आपण गरीब, वृद्ध किंवा साध्या दिसणाऱ्या माणसाला कमी लेखणं सोडू, त्या दिवशी समाज खऱ्या अर्थाने मोठा होईल."
      संपूर्ण सभागृह उभं राहून टाळ्या वाजवत होतं. समोर बसलेलं ते छोटंसं बाळ हसत होतं. त्याला माहीत नव्हतं की त्याच्या जन्माने फक्त एका कुटुंबाचं नव्हे, तर अनेकांच्या विचारांचाही पुनर्जन्म घडवला होता...
     संदेश : कधीही एखाद्या व्यक्तीची किंमत त्याच्या कपड्यांवर, पदावर किंवा पैशांवरून ठरवू नका. अनेकदा सर्वात मोठं ज्ञान आणि अनुभव हे सर्वात साध्या दिसणाऱ्या माणसांकडे असतात.                                                                              
_*लेखक - अज्ञात.*_

Friday, June 26, 2026

एकटेपणा म्हणजे आनंद की नैराश्य?

 *आगगाडी(Train )हळूहळू स्टेशन/Station(अग्निरथविश्राम धाम) सोडत होती...* 


खिडकीतून थंडगार वारा येत होता. समोरच्या बर्थवर माझी नजर गेली  एक हसरा चेहरा. वय साधारण ६५ च्या आसपास. एकटीच प्रवास करत होती. पाठीवर एक छोटी बॅग. मनालीची सोलो ट्रिप.


मी सहज विचारलं, "काकू, एकट्याच? भीती नाही वाटत?"


त्या मनापासून हसल्या. अशी हसल्या की जणू अनेक वर्षांचे ओझे त्या हसण्यात विरघळून गेले.


त्या म्हणाल्या, "बाळा, भीती तेव्हा वाटायची जेव्हा सगळे सोबत होते. आता एकटी आहे, म्हणून खऱ्या अर्थाने मोकळी आहे."


गप्पांच्या ओघात त्यांनी मला एक सुंदर जीवनधडा दिला...


त्या म्हणाल्या, "मी साठीनंतर जगायला शिकले. जेव्हा मी काही गोष्टी सोडून दिल्या..."


1) नियंत्रण ठेवण्याचा हट्ट सोडला "पूर्वी नवरा, मुलं, पैसा — सगळं आपल्या मुठीत ठेवायचा प्रयत्न करायचे. आता वाळूसारखं वाहू देते. मन खूप हलकं वाटतं."


२) लोकांकडून अपेक्षा ठेवणं सोडलं "मुलाने फोन केला तर आनंद, नाही केला तरी ठीक. मी त्याला जन्म दिला आहे, त्याच्यावर मालकी हक्क नाही."


३) लोकांना बदलण्याचा प्रयत्न सोडला "पन्नास वर्षे नवऱ्याला बदलण्याचा प्रयत्न केला. तो तसाच राहिला. मग मी स्वतःला बदललं... आणि आयुष्यात शांतता आली."


४) प्रत्येकाला खूश ठेवण्याची धडपड सोडली "सून, नातेवाईक, समाज  सगळ्यांना खूश करताना स्वतःलाच विसरून गेले होते. आता स्वतःशी प्रामाणिक राहते."


५) प्रत्येक चुकीसाठी स्वतःला दोष देणं सोडलं "भाजीत मीठ कमी-जास्त झालं तर दिवसन्-दिवस मनाला लावून घ्यायचे. आता म्हणते  मी माणूस आहे, देव नाही."


६) प्रत्येक परिणामाची चिंता करणं सोडलं "रेल्वे वेळेवर येईल की उशिरा, हे माझ्या हातात नाही. मग काळजी कशाला? चहा पिते आणि निसर्गाचा आनंद घेते."


७) भविष्याच्या भीतीने वर्तमान जगणं सोडलं "उद्या गुडघे दुखतील म्हणून आज डोंगर चढायचा नाही? आज ताकद आहे, तर आजचा दिवस जगते."


८) आपल्या हातात नसलेल्या गोष्टींवर ऊर्जा खर्च करणं सोडलं "कोण काय बोलेल, राजकारणात काय होईल, शेजारी काय म्हणतील हे सगळं सोडलं. आता रक्तदाबही सामान्य राहतो."


आता काय करते?


"स्वतःची काळजी घेते. स्वतःशी संवाद साधते. लोक काय बोलतात ते एका कानाने ऐकते आणि दुसऱ्या कानाने सोडून देते."


खिडकीबाहेर पाहत त्या म्हणाल्या 


"पाणी कोणत्या दिशेने वाहील हे माझ्या हातात नसतं बाळा... पण वादळातही माझी नाव डगमगू नये म्हणून वल्हं कसं चालवायचं, हे माझ्या हातात असतं."


सुख आणि समाधान मॉलमध्ये मिळत नाही.


समाधान त्या उशीत असतं, जिथे कोणतीही तक्रार न करता शांत झोप लागते.


समाधान त्या पावलांत असतं, जी कोणत्याही भीतीशिवाय एकटी चालायला शिकतात.


मनाली स्टेशन जवळ आलं. त्या उतरता उतरता म्हणाल्या 


"तरुणपणी मी जगाशी नाती जोडत राहिले... आता या उतारवयात स्वतःशी नातं जोडते आहे."


"म्हणूनच मी हसते... कारण आता माझ्यावर कोणतंही ओझं नाही. आता फक्त मी आहे... आणि माझं शांत, समाधानी मन." 🙏🌿


*जीवनाचा खरा आनंद इतरांना बदलण्यात नाही, तर स्वतःला समजून घेण्यात आणि स्वीकारण्यात आहे.*

म्हातारपणी भारतातच का रहावं??

म्हातारपणी भारतातच का रहावं

अमेरिकेला पाच महीने राहिल्यानंतर मनात आलेले विचार सहज पणे लिहावे असं वाटलं
यात कोणाला काही सल्ले देण्याचा हेतू नाही
आमचे पाच महीने मजेत गेले पण कायम परदेशात रहायची वेळ आली तर काय? या संबंधी विचारांच वादळ उठलं.

आमच्या किटी गृपमधे " म्हातारपणी मुलांकडे जाऊन रहावं" असा विचार मांडला गेला. मग परत नटसम्राट हे संपूर्ण नाटक आठवलं. हे नाटक म्हणजे काही फक्त  कल्पना विलास नव्हता

तरूणपणी परदेशात जरूर रहावं. भरपूर पैसे कमवावेत. पण साठी सत्तरीनंतर कुठे रहावं ?

नटसम्राट या नाटकाचा माझ्यावर खूप प्रभाव आहे. या नाटकात तरूण आणि वृद्ध असं द्वंद्व आहे. हे नाटक मी तरूणपणी पाहीलं तेव्हा मला तरूणांचच बरोबर असतं असं वाटलं, आणि आता मी लवकरच 58 होईन तेव्हा पण मला तरूणांचच बरोबर असतं असं आजही वाटतंय. त्यामुळे असा प्रश्न मनात येतो की म्हातारपण काढण्यासाठी कोणता देश चांगला? मी जरी अजून " तसा" म्हातारा झालो नसलो, तरी विचार करून ठेवायला काय हरकत आहे? 


"ते ( 80 वर्षाचे गृहस्थ) अमेरिकेत असतात सध्या त्यांच्या मुलीकडे" हे भारतात ऐकलं की ऐकणार्या भारतीयाला, ते मरण्यापूर्वीच जणू स्वर्गात गेलेत असा फील येतो. " मोठा माणूस ! " असं तो मनात म्हणतो. पण असं खरंच राहिलंय का ?

एक जमाना होता की भारतात लाल गहू मिळायचा आणि मुंबई पुणे एवढ्या अंतरासाठी कधी कधी दहा तास लागायचे
नर्गीसला उपचारासाठी अमेरिकेत जावं लागायचं. आणि पाऊस पडला की अख्ख्या मुंबईत खड्डे पडायचे.
जुन्या काळात या दुर्व्यवस्थेमुळे म्हातारे काय.... तरुणांना पण भारत नकोसा वाटायचा.

पण आता नाही तसं....भारत बदललाय

म्हातारा माणूस म्हणून लागणार्या आणि भारतात असणार्या सुविधांकडे आता आपण बघुया.

दैनंदिन सुविधा

जमाना बदलला. Express ways आले
Foreign च्या गाड्या आल्या. Superspeciality hospitals आली
ओला उबर झोमॅटो स्विगी डंझो अमेझाॅन
झेप्टो गीपे अरबन कंपनी वगैरेनी भारताचा स्वर्ग बनवला आहे. बटन दाबलं की काही क्षणात तुम्हाला आपण ठाकूर असल्याचा भास होतो, आणि गाववाले तुमची सेवा करून लुप्त होतात. अगदी माफक दरात. 
वस्तू नाही आवडली की परत घ्यायला दारात हजर.
अमेरिकेत अजूनही Door delivery नाही. 
असलीच तर फारच महाग असते.
वस्तू आणायला जावी लागते. फर्नीचर स्वतः assemble करावं लागतं. शिवाय वस्तू परत करायची असेल तर गाडी काढून एका विशिष्ट पत्यावर वस्तू देऊन यावी लागते.
तुमची गाडी तुम्हालाच धुवावी लागते, कपड्याना इस्त्री स्वतःच करावी लागते. घराची साफसफाई स्वैपाकानंतरची भांडी तुम्हालाच घासावी लागतात. अगदी एक कप चहा सुद्धा आयता मिळत नाही. तरूण पणी हे ठीक आहे पण म्हातारपणी असं काम होईल का ? तरूण पणी आपण काम करतो कारण म्हातारपणी आराम करता यावा म्हणून. मग आता म्हातारपणी सुद्धा काम काम आणि काम ?


प्रवासी सुविधा 

अमेरिकेची थंडी बघितली आणि वसंत ग्रीष्म हे ॠतू पण बघितले. भारतात 365 दिवसांपैकी 360 दिवस तरी हवा उबदार असते. बाहेर जाण्यासाठी कोणतीही नैसर्गिक विपदा वगैरे नसते. Occasional driver मागवून, ओला, उबर, रिक्षा वगैरेने सहज प्रवास करता येतो. हे मी खूप वय झालेल्या किंवा  driving न येणार्यांसाठी लिहीत आहे. परदेशात हीच गोष्ट dependency निर्माण करते. बर्याच ठिकाणी public transport नसतो. मग घरात अडकून राहिल्यासारखं वाटू शकतं. प्रचंड थंडी असल्यामुळे घरात कपड्यांचा एक लेयर, घराबाहेर पडताना चार लेयर, परत गाडीत दोन लेयर आणि उतरताना चार लेयर असे सोपस्कार करत बसावं लागत. तरूणपणी याची चटकन सवय होते, पण म्हातारपणी movement स्लो होतात. आणि त्याचा त्रास होतो. थंडीचे सात महिने बाहेर वाॅक वगैरे करता येत नाही.  घरात सोय नसेल तर शरीराला चालतं ठेवण्यासाठी असलेला किमान व्यायाम कसा करणार ? भारतात धुळीने भरलेले रस्ते आहेत, किचाट आहे, गर्दी आहे, घाणेरड्या सवयी असलेले लोक आहेत. पण सगळा भारत काही घाणेरडा नाही...हे सहन करणं शक्य नाही का ? तेवढे एरियाज टाळणं शक्य नाही का ?


आरोग्याच्या तक्रारी 

भारतात X ray, sonography वगैरे OPD सुविधा सहज accessible असतात. त्यासाठी पर Dr वगैरेचं prescription लागत नाही.  पुन्हा त्याचे result normal असतील तर ते लगेच कळतं. " सगळं काही नाॅर्मल आहे" असं तो technician च आपल्याला सांगतो. रिपोर्ट हातात ठेवतो. अमेरिकेत specialist च्या उरावर परत डाॅलर घालून तुम्हाला तुम्ही नाॅर्मल असल्याचं ऐकाव लागतं.


भारतात दर तीन वर्षानी माफक दरात  फुल्ल चेहेकप करता येतो. अमेरिकेत दाढ भरायला कमीत कमी हजार डॉलर खर्च येतो.
यावरून इतर रोगांचा अंदाज करा. कॅनडा यूकेत वगैरे फ्री मेडिकल system आहे । पण आपल्याच भारतियानी ती abuse केली आहे त्यामुळे आता ती अतिशय निकृष्ठ आहे.

साठीनंतर अशी बरीच औषधं जी OTC नसतात पण भारतात ती फार्मसी मधे ओळखीवर मिळतात. भारतात पुन्हा पुन्हा त्याच निदानासाठी आणि prescription साठी स्पेशालिस्ट च्या उरावर शेकडो डाॅलर घालावे लागत नाही. त्यामुळे जीवन सुसह्य होतं. कधी कधी आपल्यालाच माहीत असतं की आपल्याला विशेष काही झालेलं नाही. काही औषध केमिस्टकडून आणून पटकन बर होता येतं. याउलट अमेरिकेत तुम्हाला तडफडत रहावं लागतं.
US मधे प्रिस्क्रिप्शन शिवाय औषधं मिळत नाहीत.
Appointment शिवाय डॉक्टर भेटत नाही
Appointment लगेच मिळत नाही
आणि अगदी मरायला टेकल्याशिवाय emergency मधे घेत नाहीत. औषधं तर प्रचंड महाग अगदी डाॅलर ला रुपया समजलात तरी. परावलंबी झाल्यावर भारतात माणूस ठेवणं जास्त स्वस्त नाही का ?

उदरभरण

भारतात मनुष्यबळ सहज उपलब्ध आहे. एकटं असणार्या म्हातार्यांसाठी वेगवेगळे फूड options आहेत. स्वैपाकाला माणूस ठेवण्यापासून डबा आणण्यापर्यंत सोई आहेत. एखाद्या बाईला जरी स्वैपाकाची खूप आवड असली, तरी कधीतरी आयतं जेवायला द्यावं असं वाटतं. अमेरिकेत ते कसं करणार ? घरपोच काही मिळत नाही. घरगुती अन्न आणायचं तरी स्वतः गाडी काढून घ्यायला जावं लागतं

अर्थार्जन

कोणी कितीही उच्च पदस्थ म्हणून रिटायर झाला तरी जर developed country मधे उर्वरीत आयुष्य काढायचं असेल तर नोकरी ही करावीच लागते. डबोल्यावर दिवस काढता येत नाहीत. परदेशातील बहुसंख्य देशात आता retirement age 67 ते 69 आहे. त्याशिवाय पेन्शन मिळत नाही
मला वाटतं हा एक अमानुष प्रकार आहे. नोकरीमुळे माणसाला जीवनात मोकळा वेळ मिळालेला नसतो. जो रिटायरमेंट नंतर मिळतो. काही माणसं मुश्किलीने सत्तरी गाठतात आणि लुडकतात, मग या लोकानी काय नोकरी करता करताच देह ठेवायचा का ?


एकटेपणा

अमेरिकेत पाचपाचशे घरं असलेल्या कम्युनिटींमधे चिटपाखरू रस्त्यावर दिसत नाही. आज माझ्या नातीला मी खिडकीत उभं राहिलो तरी चालणारी पमपम दाखवू शकत नाही, पक्षी दाखवू शकत नाही, अर्ध्या तासाने एक गाडी येते. एखादा पक्षी दिसतो. अशा ठिकाणी म्हातारा माणूस बोअर होणार नाही का?. माझे सत्तरी पूर्वी खूप अबोल असलेले आजोबा, सत्तरीनंतर खूप बोलू लागले होते. त्यांच्या तरूणपणच्या खूप गोष्टी ते परत परत सांगत असत. पण परदेशात म्हातार्यांना श्रोता कोण ? आणि केवळ मुलं जवळ आहेत म्हणून हा एकटेपणा सहन करायचा का ?
स्पेशल सहायक साठी किती $ मोजायचे ?
बघा विचार करा. 
तुमचे विचार तुम्ही मांडाल अशी अपेक्षा आहे. क्रमशः

Sunday, May 31, 2026

आम्ही मध्यमवर्गीय होतो ..!!

 आम्ही मध्यमवर्गीय होतो ..!!

साधारण 20-25 वर्षांपूर्वी  "मध्यमवर्गीय" ही जमात अस्तित्त्वात होती. तसं तर संपूर्ण भारतभर ती पसरली होती, पण महाराष्ट्रात तिचा स्वतः चा असा 'ब्रँड' होता.


घरात एक कमावता पुरुष,दोन तीन भावंडं, नवराबायको, कुठे कुठे आजीआजोबा, क्वचित प्रसंगी भाचा-पुतण्या शिकायला अशी एकुण कुटुंबसंस्था होती. एक कमावता आणि खाणारी तोंड 5-6  हे चित्र सगळीकडे सारखंच होतं. काही ठिकाणी महिलावर्ग नोकरीसाठी बाहेर पडला होता, पण आजच्याइतका नाही.  म्हणूनच की काय घर, किचन ह्यावर स्त्रीवर्गाची सत्ता होती.....एकहाती सत्ता !! पण तिथलं तिचं स्वतःचं एक गणित होतं...पक्कं गणित..!!त्या वरच सगळे हिशोब जुळत होते.


अन्नाच्या बाबतीत,"पोटाला खा हवं तेवढं , पण नासधूस नको" असा शिरस्ता होता. माझी आजी नेहमी म्हणायची,"खाऊन माजावं, पण टाकून माजू नये."

कढी, डाळभाजी करायची त्या दिवशी वरण कमी लावायचं, आंब्याचा रस असेल तर भाजी कमी करायची, रवी लावली की त्या ताकाची कढी करायची, त्याच तुपाच्या भांड्यात दुसऱ्या दिवशी पोळ्या टाकायच्या... अशी साधी साधी समीकरण असायची. घरातली पुरूषमाणसांची आणि मुलांची जेवणं आधी करून घेतली की बायका मागून जेवायच्या. उरलंसुरलं त्या खावून घ्यायच्या. त्यांच्या पंगतीला पुरवठा म्हणून खमंग थालीपीठ किंवा गरमागरम पिठलं असायचं. इतकंही करून पोळी - भात उरलाच तर दुसऱ्या दिवशी त्याचा व्हायचा 'कुचकरा' किंवा 'फोडणीचा भात'.  जगातले सगळ्यात चविष्ट पदार्थ आहेत हे. सकाळच्या नाश्त्याचा प्रश्न परस्पर मिटायचा.


मुलांची शाळा म्हणजे 'टेन्शन'चा विषय नव्हता. आपली साधी मराठी शाळा. 200-300 रू वर्षाची फी. पण युनिफॉर्म, पुस्तके आपले आपल्याला घ्यावे लागायचे. जरा मोठाधाटा युनिफॉर्म घेतला की सहज 2 वर्ष जायचा. 

पुस्तकांचा जरा ' जुगाड ' असायचा. म्हणजे समजा 'अ' ने दुकानातून कोरीकरकरीत पुस्तकं विकत घेतली असतील, तर तो ती पुस्तकं वर्ष संपल्यावर 'ब' ला 70% किमतीत विकायचा.. अन् मग 'ब' तीच पुस्तकं  'क' ला 40% मधे विकायचा.

Purchase Cost ,Selling Cost, depreciated Value हे कामापुरतं "अर्थशास्र"  सगळ्यांनाच येत होतं. एकदा विकत घेतलेली पुस्तकं तीन वर्षं सर्रास वापरली जायची.


पुस्तकाच्या या 3 वर्षाच्या प्रवासात कधी कधी बेगम हजरत महल,अहिल्याबाई अशा 

"दूरदृष्टी च्या" व्यक्तिमत्त्वाला चष्मा लागायचा, कोणाला दागिने मिळायचे, तर कोणाला दाढी मिशी यायची. आणि हे असे उद्योग अ ब क पैकी कोणी तरी नक्कीच करत होतं.


बंगालच्या उपसागरात हमखास दोन तीन जहाज फिरत असायची. पण शाळेत असतांना, ते मॉरिशस, अंदमान निकोबार, केरला बॅकवाॅटर अशी Destinations मला नकाशात सुद्धा कधी भेटली नाहीत.


पुस्तकातल्या रिकाम्या जागा भरा,जोड्या जुळवा अशी बिनडोक कामे सहसा 'अ' करून मोकळा व्हायचा... म्हणूनच की काय त्यानंतर ब आणि क ह्यांना फक्त  चित्रकलेतच "स्कोप" उरलेला असायचा. आणि त्याचा प्रत्यय पुस्तकाच्या पानापाना वर यायचा...

शाळेचा युनिफॉर्म असल्यामुळे खूप कपडे लागत नसत.मोठ्या भावा बहिणींचे कपडे घालणं,त्यांचे दप्तर- स्वेटर वापरणं ह्यात ' इगो बिगो' कोणाचा आड येत नव्हता..

स्वेटरचा तर मोठा प्रवास असायचा.. त्यातही लहान बाळाचं स्वेटर,कपडे,दुपटे,झबले इतके फिरायचे की त्याचा मूळ मालक कोण हेही कोणाला अाठवायचं नाही..


पण आमच्या आधीच्या पिढीने शिक्षणाचे महत्त्व जाणले होते. त्यामुळे अभ्यास सगळ्यांना करावाच लागायचा. मुलींना "यंदा नापास झालीस किंवा कमी मार्क्स मिळाले तर तुझं लग्न लावून देवू.." आणि मुलांना, "तुला रिक्षा  घेवून देवू चालवायला" अशी  "जागतिक" धमकी मिळायची..


12 वी नंतर कुठल्या शाखेकडे जायचं, कोणता कोर्स करायचा, घरातल्या मोठ्या दुरुस्त्या, उपवर-उपवधू ह्यांना आलेली स्थळं ....Proposals.. हे आजच्या काळातले  "Highly Personal Issues"  त्या काळात बिनदिक्कतपणे गोलमेज परिषद भरवून चर्चिले जात. हातपाय पसरायला लागते,

तेवढीच काय ती प्रत्येकाला घरात  Space.. ...बाकी सगळा 'लेकुरवाळा' कारभार!!


आठवडी बाजारातून भाज्या आणणे, किराणा आणणे, लांबच्या लग्नाला हजेरी लावणे हा 'बाबा' लोकांचा प्रांत होता.प्रत्येक बाबांच्या तीनचार तरी  RD , LIC काढलेल्याच असायच्या.....आणि  त्यासुद्धा बहुतेक वेळा एजंटवरील प्रेमापोटी !!! बाकी शेअर्स, Mutual Fund वगैरेचा 'एजंट' त्या काळी उदयाला आलेला नव्हता.आणि कोणी काही वेगळ्या स्कीम आणल्याच, तर अगदी पाचच मिनिटात त्याच्या उत्साहाला अन् पर्यायानं त्याच्या कमीशनला सुरुंग लागायचा... Share market म्हणजे जुगार.. हा 'समज' अगदी पक्का होता..


' फॅमिली डॉक्टर' हा एक जिव्हाळ्याचा विषय होता. प्रत्येक कुटुंबाचा वेगळा डॉक्टर असायचा. आजीच्या दम्यापासून ते बाळाच्या तापापर्यंत सगळ्या व्याधीवर त्याच्याकडे औषध असायचे. तसे ते डॉक्टर पण 'नीतिमत्ता' वगैरे बाळगून होते. उगाचच आजच्या सारखं भारंभार टेस्ट अन् सोनोग्राफी करायला सांगायचे नाहीत.. गरज असेल तरच करूया,  पेशंटला परवडेल आणि ह्यांचा दवाखाना पण चालेल, असा त्यांचा 'व्यावहारिक' पवित्रा असायचा.


जसा 'फॅमिली डॉक्टर' तशीच एक फॅमिली 'बोहारीण' पण असायची. पण ती फक्त आईची मैत्रीण.. बाकी कोणी तिच्या वाट्याला जात नसत.. आई सगळे जुने कपडे एका गाठोड्यात बांधून ठेवे. मग ही  'बोहारिण' एका दुपारी अवतरायची.. आधीच दुपारच्या झोपेचं खोबरं झाल्याने, आई  जरा वैतागलेली असायची.. भलं मोठं कपड्यांचं गाठोडं विरुद्ध चहाची गाळणी अशी 'तहा' ला सुरवात व्हायची..तिची गाळणी खपवायची घाई....तर आईचा मोठ्या पातेल्यावर डोळा!!! खूप घासाघीस करून  'Deal' चहाच्या पातेल्यावर फिक्स व्हायची.. ह्या  कार्यक्रमात 2-3 तास आरामात जायचे, शेजारच्या सगळ्या आत्या, मावशी, काकू ह्या वाटाघाटीत सक्रिय सहभाग घ्यायच्या.शेवटी त्या नवीन चहाच्या पातेल्यात चहा व्हायचा आणि मगच सगळं महिला मंडळ परागंदा व्हायचं..


खरं सांगू का.. ...मध्यमवर्गीय ही काही 'परिस्थिती' नाहीये, ती  "वृत्ती" आहे......साध्या, सरळ, कुटुंबवत्सल, पापभीरू माणसांची. मध्यमवर्गीयच आहेत ह्या समाजाचा 'कणा'.. ते आहेत म्हणून तर ह्या समाजात चांगल्या वाईटाची चाड आहे.. आम्हीच आहोत नियमित 'कर' भरणारे, वाहतुकीचे काटेकोर 'नियम' पाळणारे आणि प्रत्येक निवडणुकीत 'मतदान' करणारे.


असे आम्ही सगळेच मजेत होतो बघा..अचानक 1990-91 मध्ये जागतिकीकरणाचे वारे वाहू लागले.. ते आमच्या पर्यंत यायला 10-12 वर्षे गेली पण तोपर्यंत त्या वाऱ्याच,' वादळ ' झालं होत.. अन् मग त्या वादळात उडून गेलं आमचं मध्यमवर्गीयपण..


प्रेमळ, मिळून-मिसळून राहणारे, सामाजिक बांधिलकी जपणारे आम्ही......अचानक 'प्रोफेशनल' झालो.माणसामाणसातलं आपलेपण कोरडं झालं. कालांतराने ते भेगाळलं.


पुढे पुढे त्या भेगांच्याच भिंती झाल्या.Busy Schedule, Deadlines, Projects Go Live अश्या 'गोंडस' नावाखाली आम्ही ते स्वीकारलं. गलेलठ्ठ  Packages  मधे गुंडाळल्या गेला आमच्यातला चांगुलपणा, प्रेमळपणा आणि आपलेपणा सुद्धा... . 💐. 

~अज्ञात

Monday, April 13, 2026

"स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी."

Collection Sanman 

 "आई, तू या घरात फुकट जेवतेस आणि राहतेस!" २२ लाखांचे दागिने देऊनही पोराने जेवताना आईचा अपमान केला... पण दुसऱ्या दिवशी आईने असा 'गेम' फिरवला की करोडपती लेकाने थेट आईचे पाय धरले!


नागपूरच्या धरमपेठ भागात ६२ वर्षांच्या 'अनुराधाताई' (अनुताई) राहत होत्या. त्या एका शाळेतून मुख्याध्यापिका म्हणून निवृत्त झाल्या होत्या. त्यांच्या पतीचे खूप आधीच निधन झाले होते. अनुताईंनी एकट्याने स्वतःच्या अंगावर खस्ता खाऊन आपला एकुलता एक मुलगा, 'सौरभ' याला एमबीए (MBA) पर्यंत शिकवले होते.

सौरभला स्वतःचा 'ऑरेंज एक्सपोर्ट आणि कोल्ड स्टोरेज' (संत्री निर्यात) चा मोठा बिझनेस सुरू करायचा होता. पण बँकेकडून पुरेसे कर्ज मिळत नव्हते. मुलाचे स्वप्न पूर्ण व्हावे म्हणून अनुताईंनी स्वतःच्या रिटायरमेंटचे ३० लाख रुपये आणि स्वतःच्या अंगावरचे २२ लाखांचे सोन्याचे दागिने (मंगळसूत्र आणि पाटल्या) विकून सौरभच्या हातात दिले. वर्धा रोडवर सौरभचा बिझनेस थाटात सुरू झाला. त्याची बायको, 'मिताली' हिलाही नवऱ्याच्या या यशाचा भयंकर गर्व झाला होता.

तो अपमानाचा प्रसंग आणि अन्नावरून काढलेली लायकी:

बिझनेसला दोन वर्षे पूर्ण झाली. सौरभला आता बिझनेस वाढवण्यासाठी आणि नवीन ट्रक्स घेण्यासाठी आणखी पैशांची गरज होती. त्याची नजर अनुताईंच्या 'पोस्ट ऑफिसमध्ये' असलेल्या शेवटच्या २५ लाखांच्या फिक्स डिपॉझिटवर (FD) होती. ही एफडी अनुताईंनी म्हातारपणाच्या आजारपणासाठी आणि स्वतःच्या सुरक्षिततेसाठी ठेवली होती.

रविवारी रात्री डायनिंग टेबलवर जेवताना सौरभने विषय काढला. "आई, मला ते तुझे पोस्टातले २५ लाख रुपये दे. माझा बिझनेस वाढतोय."

अनुताई शांतपणे म्हणाल्या, "बाळा, मी माझं सर्वस्व तुला दिलंय. आता तेवढेच २५ लाख माझ्या म्हातारपणाची काठी आहेत. उद्या मला दवाखाना लागला तर मी कुणापुढे हात पसरू? ते पैसे मी मोडणार नाही."

नकाराचा शब्द ऐकताच सौरभचा अहंकार दुखावला. ताटात जेवत असलेला सौरभ संतापाने उठला आणि दातओठ खात ओरडला,

"अरे कसला म्हातारपण आणि कसला दवाखाना? इथे आम्ही तुला पाळतोय ना? आई, तू या घरात 'फुकट' राहतेस आणि 'फुकट' जेवतेस! माझ्या पैशांवर जगतेस तू! माझा बिझनेस वाढतोय पण तुला तुझे पैसे द्यायला जीव जडतोय? फुकटचं खायला मात्र बरोबर चालतं!" सून मिताली बाजूला उभी राहून हसत होती. ज्या आईने स्वतःचे मंगळसूत्र विकून पोराचा बिझनेस उभा केला, तिलाच आज पोरगा अन्नावरून 'फुकटी' म्हणत होता!

अनुताईंच्या काळजाचे हजार तुकडे झाले. डोळ्यांतून पाणी आलं, पण त्या एक शब्दही बोलल्या नाहीत. त्यांनी निमूटपणे स्वतःच्या ताटातला घास तिथेच सोडला, हात धुतले आणि त्या शांतपणे आपल्या खोलीत जाऊन झोपल्या.

तो सत्याचा स्फोट आणि आईचा स्वाभिमानी प्रहार:

सौरभला वाटले आई म्हातारी आहे, दोन दिवस रडेल आणि गप्प बसेल. पण दुसऱ्या दिवशी सकाळी सौरभ ऑफिसला जाण्यापूर्वीच अनुताई घरातून बाहेर पडल्या होत्या.

दुपारी २ वाजता सौरभ त्याच्या वर्धा रोडच्या केबिनमध्ये बसला होता, तेवढ्यात त्याचा मॅनेजर धावत आला.

"सर! बँकेने आपले सर्व अकाउंट्स 'फ्रीज' (Freeze) केले आहेत. आणि आपल्या कोल्ड स्टोरेजच्या गेटवर कोर्टाची नोटीस लागली आहे!"

सौरभच्या पायाखालची जमीनच सरकली. तो पळत गेटवर आला. तिथे एक नोटीस चिकटवली होती आणि समोर त्याचे वकील उभे होते.

सौरभने विचारले, "हे काय आहे?"

वकील कडक आवाजात म्हणाले, "सौरभ, ज्या अर्धा एकर जागेवर तू हे ऑफिस आणि कोल्ड स्टोरेज उभा केलंयस ना... ती जागा तुझ्या आईच्या (अनुताईंच्या) नावावर आहे! मुलाचा बिझनेस म्हणून तिने तुला ती जागा गेल्या ३ वर्षांपासून 'फुकट' वापरायला दिली होती.

आज सकाळी तुझ्या आईने स्वतः इथे येऊन बँकेचं 'ना हरकत प्रमाणपत्र' (NOC) रद्द केलंय. आणि तुला १५ दिवसांत ही जागा रिकामी करण्याची कायदेशीर नोटीस (Eviction Notice) पाठवली आहे. तसंच, गेल्या ३ वर्षांचं या कमर्शियल जागेचं भाडं (Rent) जे '३६ लाख रुपये' होतं... ते तू न भरल्यामुळे तुझ्यावर केस ठोकली आहे!"*

अहंकाराचा चक्काचूर आणि गुडघे टेकलेला लेक:

हे ऐकताच सौरभचा श्वास अक्षरशः कोंडला गेला! बँकेचे अकाउंट्स फ्रीज झाल्यामुळे त्याचे परदेशात जाणारे कंटेनर्स थांबले होते. आईने एका झटक्यात त्याचा करोडोंचा बिझनेस रस्त्यावर आणून ठेवला होता.

सौरभ वेड्यासारखा गाडी चालवत घरी आला. घरात अनुताई त्यांची बॅग भरत होत्या.

सौरभ धावत गेला आणि त्याने थेट अनुताईंच्या पायांवर लोळण घेतली! तो ओक्साबोक्शी रडत म्हणाला, "आई... आई मला माफ कर! माझा बिझनेस बुडेल ग. मी रागाच्या भरात बोलून गेलो. ती नोटीस मागे घे आई... तुझे पाय धरतो मी!"

अनुताईंनी अत्यंत निष्ठुरपणे आपले पाय मागे घेतले. त्यांच्या चेहऱ्यावर कालची ती लाचारी नव्हती, तर एका स्वाभिमानी स्त्रीचा तेज होता.

त्या म्हणाल्या,

"सौरभ, तू काल मला म्हणालास ना की मी तुझ्या घरात 'फुकट' जेवते? बाळा, मी शिक्षिका आहे, फुकटचं खाणं माझ्या रक्तात नाही! तुझ्या या कोल्ड स्टोरेजच्या जागेचं ३ वर्षांचं भाडं ३६ लाख रुपये होतं. मी काल रात्री हिशोब केला... मी तुझ्या घरात जेवलेल्या अन्नाची आणि राहिलेल्या जागेची किंमत त्यातून वजा केली, तरीही तूच माझा कर्जदार निघतोस!

माझा हिशोब आज चुकता झालाय! ज्या आईने तुला जन्म दिला, तिला दोन घासांसाठी 'फुकटी' ठरवणाऱ्या पोराच्या घरात मला एक सेकंदही राहायचं नाही. आता तो तुझा बिझनेस आणि ती तुझी बँक तू बघ... मी माझा मार्ग मोकळा केलाय!"

अनुताईंनी स्वतःची बॅग उचलली आणि ताठ मानेने त्या घरातून कायमच्या बाहेर पडल्या. सौरभ आणि त्याची बायको मिताली रस्त्यावर उभं राहून रडत होते. करोडोंचा बिझनेस करणारा पोरगा आज एका म्हाताऱ्या आईच्या स्वाभिमानासमोर कायमचा 'भिकारी' झाला होता!

आई-वडिलांना दोन घास खायला देताना त्यांना 'फुकट्यासारखं राहतात' म्हणून टोमणे मारणाऱ्या आजच्या पिढीच्या काळजात भोक पाडणारी ही कथा !!!

Sunday, April 12, 2026

कळत नाही...कधी बदललं सगळं...

 *कळत नाही...कधी बदललं सगळं...*

@ रेणुका दर्शने 


....आमचा फोडणीचा भात... इथे फ्राईड राईस...

आमच्या बटाट्याच्या काच-या... यांच्या फ्रेंच फ्राईज...

..आमचा शेवयाचा उपमा , यांच्या मॅगी नूडल्स...

आमची थालीपीठ भाकरी , यांचा पिझ्झा .. 


..कधी राजहंस कधी पोळीचा लाडू..कधी तेल मीठ चुरमुरे..कधी घट्ट वरण चटणी...

परवापरवापर्यंत सगळं जिभेवर होतं....आता मेन्यू कार्डवरची ती इटालियन की जर्मन.. नावंही वाचताही येत नाहीत..

कळत नाही...

..कधी बदललं हे सगळं ...आता पोरांच्या जिभेवर या चवीच खेळत नाहीत... 

...कुल्फी..गारेगारच्या गाड्याभोवती गराडा जमायचा...

...ती चिंचेची झाडं आता एकाकी वाटतात...त्या लगडलेल्या झाडांभोवती चिंचेचे आकडे पाडायला, कै-या पाडायला.. पोरं जमतच नाहीत... पहिल्यासारखी...चिंचेचे गोळे,बोरं जांभळं.. पोह्याचे पापड, शेंगदाणे फुटाणे.. साखरगोळ्या...या चवी कशामुळे दबल्या.. कळत नाही ..

मुरमु-याची जागा कुरकु-यांनी घेतली...गोळ्यांची जागा कॅडबरीने ...

कोबीचं पान सिझलरखाली दबलं...ढबू मिरची नूडलमध्ये शिरली...घेवड्याची शेंग 'बीन्स' नावानं प्रचलित झाली...

कळत नाही कधी बदललं सगळं...


..आम्ही गावी पोचल्यावर कार्ड लिहायचो "पोचलो" म्हणून ..पोचायचं आठ दिवसांनी...

आता स्टॅंडवर पोचेपर्यंतच शंभर फोन होतात...

कळत नाही, कधी बदललं सगळं...

पाच दिवसांची कसोटी आता ' टी -20 ' झाली..

पंधरा मिनिटांच्या ' आजच्या ठळक बातम्या ' आता २४ तासांची करमणूक झाली, आवंढा न गिळता आणि श्वासही न घेता त्या ब्रेकिंग न्यूजचा भडिमार.. ' विनोद ' हा 'विनोद ' न रहाता ' इनोद ' होऊन बसला. मागून हसण्याचे आवाज लावलेल्या विनोदी मालिका सोडून इतरच कार्यक्रम मात्र खळखळून हसवू लागले. लोक गडाबडा लोळू लागले...

पुलंचा ' विनोद ' आता राहिला नाही...

आठवड्यातून एकदा अर्धा तास दिसणारे मालिकांतले चेहरे आता रोज ' त्रिकाळ ' दर्शन देऊ लागले...

घरोघरी स्वयंपाकघरात होणा-या 'live' पाककृती ' यू ट्यूब ' वर जाऊन बसल्या ..

आठवड्यातून एकदा भेटणारे मिकी - डोनाल्ड आता ' कार्टून ' च्या रुपातून रात्रंदिवस थैमान घालू लागले...रोजचं दूध आता पिशवीतून येतं आणि रतीब घालतात त्या रोजच्या मालिका...डेली सोप्स या गोंडस नावाखाली... 

'दूरदर्शन ' चं दर्शन बंद झालं..ती गोड धूनही ...

कौलारू शाळा ' इंटरनॅशनल ' झाल्या.गप्पा मारत चालत शाळेला जाणं आम्ही विसरून गेलो... मूल चार पोरांत ढकललं की ते आपोआप शाळेला जाऊ लागायचं...पुलंनी लिहिलंय...

११ ते ५ भरणा-या शाळासुद्धा कारखान्यांप्रमाणे शिफ्ट करू लागल्या. या कारखान्यांतून विद्यार्थी बाहेर न पडता, एखाद्या product प्रमाणे ' विकाऊ माल ' बाहेर पडू लागला...


... परीक्षा झाली की 'मामाचा गाव' खुणावायचा..मामाच्या गावाला नेणा-या 'एसट्या' आणि ' आगीनगाड्या ' आता राहिल्या नाहीत...


..चुली गेल्या ... चुलीची राखही online मिळते ... कंदील चिमण्या हद्दपार झाल्या..एवढंच काय टाॅर्चही बंद पडले...गजराची घड्याळं गेली.. कॅमे-यांत काढलेल्या फोटोंची प्रतीक्षा गेली... तो ' इंतजार का मझा ' आता राहिला नाही... एसटीडी बूथ गेले..पत्रपेट्या गेल्या..तारा गेल्या.. टीचभर मोबाईलनं आयुष्य व्यापलं... पोरांच्या हातातली विटीदांडू गेली...लगोरी गेल्या...गोट्याही गेल्या...

काऊचिऊ आता अंगणात येत नाहीत...घरांना अंगणं तरी कुठे उरलीत आता.. बाळाला घास भरवायला आईलाही समोर मोबाईलच लागतो...आजीच्या गोष्टी गेल्या ..अंगाई गेली...'मायेच्या गोधड्या' गेल्या...आज्या आता नऊवारी नेसत नाहीत...आजोबा धोतर नेसत नाहीत...एवढंच काय पोरांची लंगोट दुपटीही गेली...


...फॅशनच्या नावाखाली आता गोणपाटाचेही कपडे आले...फाटकं घालायचं नाही.. असा त दंडक होता...आता चिंध्या झालेल्या कपड्यांचीच फॅशन आली...

कळत नाही..कधी बदललं सगळं...

'बटाट्याच्या' चाळीसारख्या चाळी गेल्या..वाडे गेले...

दारांची कुलपं गेली, लॅच आले ..दाराला संशयाने बघणारी छिद्रं आली .. दिवसा सताड उघडी ...रात्री बंद होणारी दारं ..दिवसरात्र बंद झाली...कळत नाही माणसं अशी घरात कोंडून कधी पडली...


...*आईवडील आणि प्रेम सोडून आता सगळं online मिळतं...शेणाच्या गोव-या ते कार....सगळं सगळं....*

..आता केव्हाही कधीही ते झोमॅटो बिमॅटो  आपलं पोट भरतं..

*पण ते सुखसमाधान कोप-यात कुठंतरी दडून बसतं...*


- रेणुका दर्शने, पुणे ( copyright)

.......... 🌹

Thursday, March 5, 2026

जीवनाची खरी साधने

 जीवनाची खरी साधने


स्वयंपाकघरातील नळ पुन्हा एकदा गळत होता. कंटाळून मी प्लंबरला फोन केला.


थोड्याच वेळात एक मध्यमवयीन गृहस्थ आले — शांत, स्थिर, हातात जुनी, झिजलेली टूलबॅग.


मी त्यांना काम करताना पाहत होतो. त्यांनी पाना काढला — हँडलजवळ तो तुटलेला होता.


“अशा साधनांनी हा काय काम करणार?” असा विचार माझ्या मनात आला.


पण त्यांना काहीच फरक पडलेला दिसला नाही. शांतपणे त्यांनी पाइप सैल केला. एक गंजलेला भाग कापावा लागणार होता. त्यांनी पुन्हा बॅगेत हात घातला आणि एक छोटी करवत काढली — तिचा अर्धा भागच नव्हता!


आता मला खात्री वाटली — मी चुकीच्या माणसाला बोलावलं आहे. पण अवघ्या दहा मिनिटांत गळती थांबली. नळ चमकत होता आणि थेंबही गळत नव्हता.


मी त्यांना शंभर रुपयांची नोट दिली. त्यांनी नकार दिला. “नको साहेब. यातील अर्धेच पुरेसे आहेत.”


मी आश्चर्याने पाहिलं. “आजकाल जास्त पैसे कोण नाकारतं?”


ते हसले — शांत, स्थिर हास्य.


“साहेब, प्रत्येक कामाची एक ठरलेली किंमत असते. आज जास्त घेतलं, तर उद्या जास्त अपेक्षा राहील. तेव्हा मिळालं नाही, तर मन अस्वस्थ होईल. म्हणून जे योग्य आहे तेवढंच घेणं मला समाधान देतं.”


मी हळूच मान डोलावली. “किमान स्वतःसाठी नवा पाना आणि करवत घ्या. काम सोपं होईल.”


ते हलकेच हसले. “अहो साहेब… साधनं झिजण्यासाठीच असतात. तेच त्यांचं नशीब. पण तुटलेली, ओरबाडलेली असली तरी ती आपलं काम करतात. ज्येष्ठ माणसांसारखीच — काही जखमा आल्या म्हणून ते निरुपयोगी ठरत नाहीत.”


क्षणभर थांबून ते पुढे म्हणाले, “तुम्ही ऑफिसमध्ये लिहिता तेव्हा कोणता पेन वापरता याने फरक पडतो का? महाग किंवा साधा — लिहिता येत असेल तर कुठल्याही पेनाने चांगलं लिहिता येतं. पण लिहिताच येत नसेल, तर सर्वात महाग पेनही उपयोगाचं नाही. कौशल्य हातात असतं, साधनात नाही.”


मी नि:शब्द उभा राहिलो. त्यांचे शब्द खोलवर मनात उतरले. त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान दुर्मिळ होतं — जे पैसा कधीच देऊ शकत नाही.


> *एक जपण्यासारखा विचार*


> *संपत्ती आणि सुखाच्या अखंड शर्यतीत आपण जीवनातील खरी “साधने” विसरतो — प्रामाणिकपणा, मेहनत, कृतज्ञता, आणि समाधान.*


> *ही जर टिकून असतील, तर तुटकी साधनंही चमत्कार घडवू शकतात. पण तीच नसतील, तर जगभरची संपत्तीही आपल्या आतल्या गळती थांबवू शकत नाही.*


🙏🙏


लेखक - अज्ञात


..........✍️