Monday, April 13, 2026

"स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी."

Collection Sanman 

 "आई, तू या घरात फुकट जेवतेस आणि राहतेस!" २२ लाखांचे दागिने देऊनही पोराने जेवताना आईचा अपमान केला... पण दुसऱ्या दिवशी आईने असा 'गेम' फिरवला की करोडपती लेकाने थेट आईचे पाय धरले!


नागपूरच्या धरमपेठ भागात ६२ वर्षांच्या 'अनुराधाताई' (अनुताई) राहत होत्या. त्या एका शाळेतून मुख्याध्यापिका म्हणून निवृत्त झाल्या होत्या. त्यांच्या पतीचे खूप आधीच निधन झाले होते. अनुताईंनी एकट्याने स्वतःच्या अंगावर खस्ता खाऊन आपला एकुलता एक मुलगा, 'सौरभ' याला एमबीए (MBA) पर्यंत शिकवले होते.

सौरभला स्वतःचा 'ऑरेंज एक्सपोर्ट आणि कोल्ड स्टोरेज' (संत्री निर्यात) चा मोठा बिझनेस सुरू करायचा होता. पण बँकेकडून पुरेसे कर्ज मिळत नव्हते. मुलाचे स्वप्न पूर्ण व्हावे म्हणून अनुताईंनी स्वतःच्या रिटायरमेंटचे ३० लाख रुपये आणि स्वतःच्या अंगावरचे २२ लाखांचे सोन्याचे दागिने (मंगळसूत्र आणि पाटल्या) विकून सौरभच्या हातात दिले. वर्धा रोडवर सौरभचा बिझनेस थाटात सुरू झाला. त्याची बायको, 'मिताली' हिलाही नवऱ्याच्या या यशाचा भयंकर गर्व झाला होता.

तो अपमानाचा प्रसंग आणि अन्नावरून काढलेली लायकी:

बिझनेसला दोन वर्षे पूर्ण झाली. सौरभला आता बिझनेस वाढवण्यासाठी आणि नवीन ट्रक्स घेण्यासाठी आणखी पैशांची गरज होती. त्याची नजर अनुताईंच्या 'पोस्ट ऑफिसमध्ये' असलेल्या शेवटच्या २५ लाखांच्या फिक्स डिपॉझिटवर (FD) होती. ही एफडी अनुताईंनी म्हातारपणाच्या आजारपणासाठी आणि स्वतःच्या सुरक्षिततेसाठी ठेवली होती.

रविवारी रात्री डायनिंग टेबलवर जेवताना सौरभने विषय काढला. "आई, मला ते तुझे पोस्टातले २५ लाख रुपये दे. माझा बिझनेस वाढतोय."

अनुताई शांतपणे म्हणाल्या, "बाळा, मी माझं सर्वस्व तुला दिलंय. आता तेवढेच २५ लाख माझ्या म्हातारपणाची काठी आहेत. उद्या मला दवाखाना लागला तर मी कुणापुढे हात पसरू? ते पैसे मी मोडणार नाही."

नकाराचा शब्द ऐकताच सौरभचा अहंकार दुखावला. ताटात जेवत असलेला सौरभ संतापाने उठला आणि दातओठ खात ओरडला,

"अरे कसला म्हातारपण आणि कसला दवाखाना? इथे आम्ही तुला पाळतोय ना? आई, तू या घरात 'फुकट' राहतेस आणि 'फुकट' जेवतेस! माझ्या पैशांवर जगतेस तू! माझा बिझनेस वाढतोय पण तुला तुझे पैसे द्यायला जीव जडतोय? फुकटचं खायला मात्र बरोबर चालतं!" सून मिताली बाजूला उभी राहून हसत होती. ज्या आईने स्वतःचे मंगळसूत्र विकून पोराचा बिझनेस उभा केला, तिलाच आज पोरगा अन्नावरून 'फुकटी' म्हणत होता!

अनुताईंच्या काळजाचे हजार तुकडे झाले. डोळ्यांतून पाणी आलं, पण त्या एक शब्दही बोलल्या नाहीत. त्यांनी निमूटपणे स्वतःच्या ताटातला घास तिथेच सोडला, हात धुतले आणि त्या शांतपणे आपल्या खोलीत जाऊन झोपल्या.

तो सत्याचा स्फोट आणि आईचा स्वाभिमानी प्रहार:

सौरभला वाटले आई म्हातारी आहे, दोन दिवस रडेल आणि गप्प बसेल. पण दुसऱ्या दिवशी सकाळी सौरभ ऑफिसला जाण्यापूर्वीच अनुताई घरातून बाहेर पडल्या होत्या.

दुपारी २ वाजता सौरभ त्याच्या वर्धा रोडच्या केबिनमध्ये बसला होता, तेवढ्यात त्याचा मॅनेजर धावत आला.

"सर! बँकेने आपले सर्व अकाउंट्स 'फ्रीज' (Freeze) केले आहेत. आणि आपल्या कोल्ड स्टोरेजच्या गेटवर कोर्टाची नोटीस लागली आहे!"

सौरभच्या पायाखालची जमीनच सरकली. तो पळत गेटवर आला. तिथे एक नोटीस चिकटवली होती आणि समोर त्याचे वकील उभे होते.

सौरभने विचारले, "हे काय आहे?"

वकील कडक आवाजात म्हणाले, "सौरभ, ज्या अर्धा एकर जागेवर तू हे ऑफिस आणि कोल्ड स्टोरेज उभा केलंयस ना... ती जागा तुझ्या आईच्या (अनुताईंच्या) नावावर आहे! मुलाचा बिझनेस म्हणून तिने तुला ती जागा गेल्या ३ वर्षांपासून 'फुकट' वापरायला दिली होती.

आज सकाळी तुझ्या आईने स्वतः इथे येऊन बँकेचं 'ना हरकत प्रमाणपत्र' (NOC) रद्द केलंय. आणि तुला १५ दिवसांत ही जागा रिकामी करण्याची कायदेशीर नोटीस (Eviction Notice) पाठवली आहे. तसंच, गेल्या ३ वर्षांचं या कमर्शियल जागेचं भाडं (Rent) जे '३६ लाख रुपये' होतं... ते तू न भरल्यामुळे तुझ्यावर केस ठोकली आहे!"*

अहंकाराचा चक्काचूर आणि गुडघे टेकलेला लेक:

हे ऐकताच सौरभचा श्वास अक्षरशः कोंडला गेला! बँकेचे अकाउंट्स फ्रीज झाल्यामुळे त्याचे परदेशात जाणारे कंटेनर्स थांबले होते. आईने एका झटक्यात त्याचा करोडोंचा बिझनेस रस्त्यावर आणून ठेवला होता.

सौरभ वेड्यासारखा गाडी चालवत घरी आला. घरात अनुताई त्यांची बॅग भरत होत्या.

सौरभ धावत गेला आणि त्याने थेट अनुताईंच्या पायांवर लोळण घेतली! तो ओक्साबोक्शी रडत म्हणाला, "आई... आई मला माफ कर! माझा बिझनेस बुडेल ग. मी रागाच्या भरात बोलून गेलो. ती नोटीस मागे घे आई... तुझे पाय धरतो मी!"

अनुताईंनी अत्यंत निष्ठुरपणे आपले पाय मागे घेतले. त्यांच्या चेहऱ्यावर कालची ती लाचारी नव्हती, तर एका स्वाभिमानी स्त्रीचा तेज होता.

त्या म्हणाल्या,

"सौरभ, तू काल मला म्हणालास ना की मी तुझ्या घरात 'फुकट' जेवते? बाळा, मी शिक्षिका आहे, फुकटचं खाणं माझ्या रक्तात नाही! तुझ्या या कोल्ड स्टोरेजच्या जागेचं ३ वर्षांचं भाडं ३६ लाख रुपये होतं. मी काल रात्री हिशोब केला... मी तुझ्या घरात जेवलेल्या अन्नाची आणि राहिलेल्या जागेची किंमत त्यातून वजा केली, तरीही तूच माझा कर्जदार निघतोस!

माझा हिशोब आज चुकता झालाय! ज्या आईने तुला जन्म दिला, तिला दोन घासांसाठी 'फुकटी' ठरवणाऱ्या पोराच्या घरात मला एक सेकंदही राहायचं नाही. आता तो तुझा बिझनेस आणि ती तुझी बँक तू बघ... मी माझा मार्ग मोकळा केलाय!"

अनुताईंनी स्वतःची बॅग उचलली आणि ताठ मानेने त्या घरातून कायमच्या बाहेर पडल्या. सौरभ आणि त्याची बायको मिताली रस्त्यावर उभं राहून रडत होते. करोडोंचा बिझनेस करणारा पोरगा आज एका म्हाताऱ्या आईच्या स्वाभिमानासमोर कायमचा 'भिकारी' झाला होता!

आई-वडिलांना दोन घास खायला देताना त्यांना 'फुकट्यासारखं राहतात' म्हणून टोमणे मारणाऱ्या आजच्या पिढीच्या काळजात भोक पाडणारी ही कथा !!!

Sunday, April 12, 2026

कळत नाही...कधी बदललं सगळं...

 *कळत नाही...कधी बदललं सगळं...*

@ रेणुका दर्शने 


....आमचा फोडणीचा भात... इथे फ्राईड राईस...

आमच्या बटाट्याच्या काच-या... यांच्या फ्रेंच फ्राईज...

..आमचा शेवयाचा उपमा , यांच्या मॅगी नूडल्स...

आमची थालीपीठ भाकरी , यांचा पिझ्झा .. 


..कधी राजहंस कधी पोळीचा लाडू..कधी तेल मीठ चुरमुरे..कधी घट्ट वरण चटणी...

परवापरवापर्यंत सगळं जिभेवर होतं....आता मेन्यू कार्डवरची ती इटालियन की जर्मन.. नावंही वाचताही येत नाहीत..

कळत नाही...

..कधी बदललं हे सगळं ...आता पोरांच्या जिभेवर या चवीच खेळत नाहीत... 

...कुल्फी..गारेगारच्या गाड्याभोवती गराडा जमायचा...

...ती चिंचेची झाडं आता एकाकी वाटतात...त्या लगडलेल्या झाडांभोवती चिंचेचे आकडे पाडायला, कै-या पाडायला.. पोरं जमतच नाहीत... पहिल्यासारखी...चिंचेचे गोळे,बोरं जांभळं.. पोह्याचे पापड, शेंगदाणे फुटाणे.. साखरगोळ्या...या चवी कशामुळे दबल्या.. कळत नाही ..

मुरमु-याची जागा कुरकु-यांनी घेतली...गोळ्यांची जागा कॅडबरीने ...

कोबीचं पान सिझलरखाली दबलं...ढबू मिरची नूडलमध्ये शिरली...घेवड्याची शेंग 'बीन्स' नावानं प्रचलित झाली...

कळत नाही कधी बदललं सगळं...


..आम्ही गावी पोचल्यावर कार्ड लिहायचो "पोचलो" म्हणून ..पोचायचं आठ दिवसांनी...

आता स्टॅंडवर पोचेपर्यंतच शंभर फोन होतात...

कळत नाही, कधी बदललं सगळं...

पाच दिवसांची कसोटी आता ' टी -20 ' झाली..

पंधरा मिनिटांच्या ' आजच्या ठळक बातम्या ' आता २४ तासांची करमणूक झाली, आवंढा न गिळता आणि श्वासही न घेता त्या ब्रेकिंग न्यूजचा भडिमार.. ' विनोद ' हा 'विनोद ' न रहाता ' इनोद ' होऊन बसला. मागून हसण्याचे आवाज लावलेल्या विनोदी मालिका सोडून इतरच कार्यक्रम मात्र खळखळून हसवू लागले. लोक गडाबडा लोळू लागले...

पुलंचा ' विनोद ' आता राहिला नाही...

आठवड्यातून एकदा अर्धा तास दिसणारे मालिकांतले चेहरे आता रोज ' त्रिकाळ ' दर्शन देऊ लागले...

घरोघरी स्वयंपाकघरात होणा-या 'live' पाककृती ' यू ट्यूब ' वर जाऊन बसल्या ..

आठवड्यातून एकदा भेटणारे मिकी - डोनाल्ड आता ' कार्टून ' च्या रुपातून रात्रंदिवस थैमान घालू लागले...रोजचं दूध आता पिशवीतून येतं आणि रतीब घालतात त्या रोजच्या मालिका...डेली सोप्स या गोंडस नावाखाली... 

'दूरदर्शन ' चं दर्शन बंद झालं..ती गोड धूनही ...

कौलारू शाळा ' इंटरनॅशनल ' झाल्या.गप्पा मारत चालत शाळेला जाणं आम्ही विसरून गेलो... मूल चार पोरांत ढकललं की ते आपोआप शाळेला जाऊ लागायचं...पुलंनी लिहिलंय...

११ ते ५ भरणा-या शाळासुद्धा कारखान्यांप्रमाणे शिफ्ट करू लागल्या. या कारखान्यांतून विद्यार्थी बाहेर न पडता, एखाद्या product प्रमाणे ' विकाऊ माल ' बाहेर पडू लागला...


... परीक्षा झाली की 'मामाचा गाव' खुणावायचा..मामाच्या गावाला नेणा-या 'एसट्या' आणि ' आगीनगाड्या ' आता राहिल्या नाहीत...


..चुली गेल्या ... चुलीची राखही online मिळते ... कंदील चिमण्या हद्दपार झाल्या..एवढंच काय टाॅर्चही बंद पडले...गजराची घड्याळं गेली.. कॅमे-यांत काढलेल्या फोटोंची प्रतीक्षा गेली... तो ' इंतजार का मझा ' आता राहिला नाही... एसटीडी बूथ गेले..पत्रपेट्या गेल्या..तारा गेल्या.. टीचभर मोबाईलनं आयुष्य व्यापलं... पोरांच्या हातातली विटीदांडू गेली...लगोरी गेल्या...गोट्याही गेल्या...

काऊचिऊ आता अंगणात येत नाहीत...घरांना अंगणं तरी कुठे उरलीत आता.. बाळाला घास भरवायला आईलाही समोर मोबाईलच लागतो...आजीच्या गोष्टी गेल्या ..अंगाई गेली...'मायेच्या गोधड्या' गेल्या...आज्या आता नऊवारी नेसत नाहीत...आजोबा धोतर नेसत नाहीत...एवढंच काय पोरांची लंगोट दुपटीही गेली...


...फॅशनच्या नावाखाली आता गोणपाटाचेही कपडे आले...फाटकं घालायचं नाही.. असा त दंडक होता...आता चिंध्या झालेल्या कपड्यांचीच फॅशन आली...

कळत नाही..कधी बदललं सगळं...

'बटाट्याच्या' चाळीसारख्या चाळी गेल्या..वाडे गेले...

दारांची कुलपं गेली, लॅच आले ..दाराला संशयाने बघणारी छिद्रं आली .. दिवसा सताड उघडी ...रात्री बंद होणारी दारं ..दिवसरात्र बंद झाली...कळत नाही माणसं अशी घरात कोंडून कधी पडली...


...*आईवडील आणि प्रेम सोडून आता सगळं online मिळतं...शेणाच्या गोव-या ते कार....सगळं सगळं....*

..आता केव्हाही कधीही ते झोमॅटो बिमॅटो  आपलं पोट भरतं..

*पण ते सुखसमाधान कोप-यात कुठंतरी दडून बसतं...*


- रेणुका दर्शने, पुणे ( copyright)

.......... 🌹

Thursday, March 5, 2026

जीवनाची खरी साधने

 जीवनाची खरी साधने


स्वयंपाकघरातील नळ पुन्हा एकदा गळत होता. कंटाळून मी प्लंबरला फोन केला.


थोड्याच वेळात एक मध्यमवयीन गृहस्थ आले — शांत, स्थिर, हातात जुनी, झिजलेली टूलबॅग.


मी त्यांना काम करताना पाहत होतो. त्यांनी पाना काढला — हँडलजवळ तो तुटलेला होता.


“अशा साधनांनी हा काय काम करणार?” असा विचार माझ्या मनात आला.


पण त्यांना काहीच फरक पडलेला दिसला नाही. शांतपणे त्यांनी पाइप सैल केला. एक गंजलेला भाग कापावा लागणार होता. त्यांनी पुन्हा बॅगेत हात घातला आणि एक छोटी करवत काढली — तिचा अर्धा भागच नव्हता!


आता मला खात्री वाटली — मी चुकीच्या माणसाला बोलावलं आहे. पण अवघ्या दहा मिनिटांत गळती थांबली. नळ चमकत होता आणि थेंबही गळत नव्हता.


मी त्यांना शंभर रुपयांची नोट दिली. त्यांनी नकार दिला. “नको साहेब. यातील अर्धेच पुरेसे आहेत.”


मी आश्चर्याने पाहिलं. “आजकाल जास्त पैसे कोण नाकारतं?”


ते हसले — शांत, स्थिर हास्य.


“साहेब, प्रत्येक कामाची एक ठरलेली किंमत असते. आज जास्त घेतलं, तर उद्या जास्त अपेक्षा राहील. तेव्हा मिळालं नाही, तर मन अस्वस्थ होईल. म्हणून जे योग्य आहे तेवढंच घेणं मला समाधान देतं.”


मी हळूच मान डोलावली. “किमान स्वतःसाठी नवा पाना आणि करवत घ्या. काम सोपं होईल.”


ते हलकेच हसले. “अहो साहेब… साधनं झिजण्यासाठीच असतात. तेच त्यांचं नशीब. पण तुटलेली, ओरबाडलेली असली तरी ती आपलं काम करतात. ज्येष्ठ माणसांसारखीच — काही जखमा आल्या म्हणून ते निरुपयोगी ठरत नाहीत.”


क्षणभर थांबून ते पुढे म्हणाले, “तुम्ही ऑफिसमध्ये लिहिता तेव्हा कोणता पेन वापरता याने फरक पडतो का? महाग किंवा साधा — लिहिता येत असेल तर कुठल्याही पेनाने चांगलं लिहिता येतं. पण लिहिताच येत नसेल, तर सर्वात महाग पेनही उपयोगाचं नाही. कौशल्य हातात असतं, साधनात नाही.”


मी नि:शब्द उभा राहिलो. त्यांचे शब्द खोलवर मनात उतरले. त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान दुर्मिळ होतं — जे पैसा कधीच देऊ शकत नाही.


> *एक जपण्यासारखा विचार*


> *संपत्ती आणि सुखाच्या अखंड शर्यतीत आपण जीवनातील खरी “साधने” विसरतो — प्रामाणिकपणा, मेहनत, कृतज्ञता, आणि समाधान.*


> *ही जर टिकून असतील, तर तुटकी साधनंही चमत्कार घडवू शकतात. पण तीच नसतील, तर जगभरची संपत्तीही आपल्या आतल्या गळती थांबवू शकत नाही.*


🙏🙏


लेखक - अज्ञात


..........✍️