स्मृतिंच्या गाठोड्यातील आठवणी...... आरोग्यदायी गुरुकिल्ली.
प्रत्येक माणसांत चांगुलपणा असतोच पण तो चांगुलपणा उपयोगात आणून जीवन सार्थक बनविणे सोप्पं नसते.आजच्या काळात जरी ही बाब सामान्य वाटत असली तरीही ५०वर्षांपूर्वी अत्यंत दुर्मिळ होते, किंबहुना अशक्यच होते आणि यालाच अपवाद म्हणजे माझे चुलत काका डॉक्टर विठ्ठल प्रभू. डॉक्टरांची माझा संपर्क मी लहान होते तेव्हापासून जरीअसला तरीही त्यांची खरी किमया मला खूप उशिरा जाणवली. कारण त्यांची भेट होत असताना आधी जास्त संवाद झालाच नाही कारण वर्षातून एकदा गणपतीच्या वेळी भेटव्हायची. त्यावेळी फक्त विचारपूस आणि गप्पा गोष्टीत वेळ कसा निघून जायचा ते कळायचेच नाही. गप्पा गोष्टी वडीलधारी माणसांची आणि आम्ही चिल्लर पार्टी आपल्यामस्तीत मग्न. चर्चेच्या मधोमध डॉक्टर विठ्ठल प्रभू हे हसऱ्या चेहऱ्याने आम्हाला हाक मारून आमच्याशी बोलायचे. बाल रोग तज्ञ म्हणून तेव्हा आम्ही त्यांना ओळखायचं. मलाआजही
तो दिवस आठवतो जेव्हा माझ्या आईने आमच्याबद्दल म्हणजेच माझ्या दादा आणि माझ्याबद्दल त्यांच्याशी तक्रार केली की आम्ही
खाण्यापिण्याच्या बाबतीत खूपच हट्ट करतो. अमुक नको, तमुक नको आणि पालेभाजी तर नकोच. डॉक्टर विठ्ठल काकांनी मिश्किलपणे आमच्याकडे पाहून आईला सांगितले कीजबरदस्तीने अन्न भरवू नये. अन्न प्रसन्नचित्त मनाने खाल्ल्यास त्याची पौष्टिकता अधिक कामी येते नाहीतर त्या अन्नाचा आणि त्यातली पौष्टिकता निरर्थक ठरते. त्या घटने नंतरनेहमी मी आतुर असायची काकांच्या भेटीला. गणपती बाप्पा ची वाट बघणं एक निमित्त ठरलं काकांची भेटण्यासाठी.
विठ्ठल प्रभू डॉक्टरांशी संपर्क जसाजसा वाढू लागला तसा तसा बदल मी माझ्यात अनुभवू लागली. प्रत्येक भेटीत काहीतरी नवीन शिकायला भेटायचं. प्रत्येक भेटीतूनसमुपदेशनाचे धडे कानी पडायचे. काका डॉक्टर आहेत हे माहीत होते पण कामजीवन तज्ञ आहेत हे खूप वर्षाने समजले. खूप वर्ष असले तरीही माझ्या जीवनासाठी तीच योग्य वेळहोती. याचे कारण आमच्या आई-बाबांनी कधीही आमच्याशी उघडपणे चर्चा केलीच नव्हती. बहुतेक त्याकाळी तसेच होते पण विठ्ठल प्रभूंची प्रभावशाली व्याख्याने ऐकल्या नंतरहळूहळू समजू लागले .तेव्हा हे ही समजले की काही संवेदनशील विषया बाबतीत वाढत्या वयात मुला-मुलींना सारं समजावून सांगणारे डॉक्टर मित्र आम्हाला लाभले आहेत. डॉक्टर काकांची एक नवी ओळख माझ्या नजरेसमोर प्रकट होऊ लागली. आम्ही प्रत्यक्ष न भेटून सुद्धा त्यांच्या पुस्तकाद्वारे व समुपदेशनाच्या कार्यशाळेद्वारे माझ्या आणि असंख्यतरुण-तरुणींच्या विचारात बदल घडत असताना दिसू लागला. जिथे संवेदनशील विषयावर बोलणे म्हणजेच लाज आणि मर्यादा सोडून बोलणे समजलं जायचे तिथेच आता तरुणपिढी बेधडक चर्चा करताना आढळले. ज्या घरी पोटच्या पोरीला वयात आल्यावर मासिक पाळी विषयी खबरदारी घेण्याविषयी बोलायला लज्जास्पद समजायचे त्या मुलींकरिता डॉक्टर विठ्ठल प्रभू हे एक वरदानच ठरले. त्यांनी आपल्या पुस्तकाद्वारे मौल्यवान माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवली. कामजीवनावर पुस्तक लिहिणे त्याकाळी खरच एक अजब कार्यहोते .ते कार्यकर्त्यांना किती अडथळे सामाजिक बंधने शिवीगाळ सोसली असतील .तरीही माघार न घेता पुढे चालतच गेले. मुंबईतल्या दर्जेदार आणि सुप्रसिद्ध कामजीवन विशेषज्ञम्हणून त्यांची प्रतिमा लोकांसमोर उद्भवू लागली.
डॉक्टरांनी आपल्या कारकिर्दीत लेखनाद्वारे आणि समुपदेशनाद्वारे रे हे स्पष्ट दाखवून दिले की आपण घेतलेला निर्णय हा कधीच चुकीचा नसतो फक्त तो बरोबर आहे हे सिद्धकरण्याची जिद्द आपल्यात हवी असते आणि तीच जिद्द मला डॉक्टर विठ्ठल प्रभू मध्ये दिसून आली. ही जिद्द होती ती सामाजिक परिवर्तन घडवून आणण्याची. समाज म्हणजेचआपण सारे ,आपले विचार, आणि वर्तणुकीवर समाजाचा विकास अवलंबून आहे. हा विकास, जर घडवायचा असेल असेल तर ,डॉक्टर विठ्ठल प्रभू सारखी लोक आणि त्यांच्याविचारसरणी म्हणजेच, आधुनिक विचारसरणी ची गरज आजच्या जगाला आहे. ही गरज समजून घेणाऱ्या लोकांमध्ये हे डॉक्टर विठ्ठल प्रभू यांचा समावेश आहे. त्यांनी समाजालाघडवण्या आधी, समाजाचा विकास ज्यावर अवलंबून आहे ती पिढी, म्हणजेच तरुण पिढी, त्यांना सशक्त बनवायचे ठरविले. सशक्त बनविले ,ते ज्ञानाचे शस्त्र हाती देऊन ,कारणत्यांना ते माहीत होते की , हे शस्त्र कधीच निकामी ठरणार नाही .या शास्त्राची चमक नेहमीच राहील .या शस्त्राचा उपयोग पावलोपावली केला जाईल. आणि मुख्य म्हणजे हे असेएक मात्र शास्त्र आहे जे दुसऱ्यांच्या हाती देऊन आपल्याला अपराधीपणाची भावना मनी न येऊ देता,समाज प्रगतिशील बनविण्याच्या कार्यात हातभार लावल्याचे समाधानी सुख मनी लाभेल.
डॉक्टर विठ्ठल प्रभूंनी असंख्य लोकांना निराशे कडून आशेच्या मार्गावर नेले. तिथे नेताना, त्यांच्या मनात असलेल्या, अनेक प्रश्नांची उत्तरे, त्यांनी स्वतः शोधण्याकरिता ,त्यांनासक्षम बनविले. हे करीत असताना, ते मात्र झिजत गेले. स्वतःला आपल्या कामात त्यांनी इतके गुंतून ठेवले होते , की त्यांना स्वतःसाठी विचार करण्यास वेळच मिळत नसे. मलातरी असे वाटते की डॉक्टर विठ्ठल प्रभू सारख्या व्यक्तिमत्त्वाचे विचार, हे थोर आणि निस्वार्थ भावना चे होते." गंजून संपन्या पेक्षा झिजून संपणे चांगले" असल्या विचारांचे होतेडॉक्टर विठ्ठल प्रभू.
या त्यांच्या खडतर जीवन प्रवासात अमूल्य वाटा त्यांच्या पत्नीचा म्हणजेच, डॉक्टर वीणा विठ्ठल प्रभू यांचा आहे. जीवनसाथी, अर्धांगिनी या शब्दाचा खरा अर्थ, फक्तशब्दातच नव्हे , तर कार्याद्वारे त्यांनी दर्शवून दिले .डॉक्टर विणा प्रभू हे डॉक्टर असल्या कारणी, डॉक्टरांच्या निस्वार्थ सेवेची जाणीव ,त्यांना होती. ते नेहमी डॉक्टर विठ्ठल प्रभूयांच्या बरोबर असायच्या. मी भेटायला गेले असता, आमच्याबरोबर ते देखील चर्चेत सामील व्हायचे .चहा-नाश्ता अगत्याने आणून समोर ठेवायचे .आमच्या भेटीचे चित्रीकरणकरून, ते सवडीच्या वेळी पाहण्यासाठी संग्रहित करायचे. हसरा चेहरा डॉक्टरांचा आणि त्यांच्या पत्नीचा ,आजही जेव्हा डोळ्यासमोर येतो डोळ्यात एक चमक आणि मन उत्साहितआणि प्रफुल्लित होतं त्यांच्या आठवणी सलग नजरेसमोर येऊ लागतात. या आठवणींचा विसर कधीच न पडण्याजोगी आहे.
27 फेब्रुवारी 2019 रोजी जेव्हा मला समजले की डॉक्टर विठ्ठल प्रभू आम्हाला सोडून गेले , तेव्हा मनात एक पोकळी निर्माण झाल्याचा भास झाला. हा भास नसून, सत्यपरिस्थिती आहे ,हे मनाला पटवून देण्यास ,खूपच कठीण होऊन बसले. मला पोरकं झाल्यासारखं वाटलं. त्यांच्याविषयी जितकं सांगावं तितकच कमी. लांब असून सुद्धा, हाकेच्याअंतरावर असल्याचा भास होत असे. माझी आणि त्यांची शेवटची भेट 20 जानेवारी 2019 रोजी झाली. त्या भेटीत सुद्धा माझ्याशी खूप बोलले सगळ्या जुन्या आठवणी ताजीकरीत गेले . मला नेहमी प्रोत्साहन देत , आशेचा किरण दाखवीत ,प्रत्येक कठीण प्रसंगी ,बिनधास्त सामोरे जाण्याची गुरुकिल्ली ते नेहमी देत असे. या एका दुःखातून सावरतअसतानाच ६ मार्च 2019 रोजी आणखी एक दुखद बातमी कानी पडली .ती म्हणजे डॉक्टर विणा विठ्ठल प्रभू याही आम्हाला सोडून गेल्या. इथला प्रवास एकत्र संपून पुढच्याप्रवासाला ही एकत्रच निघाले. या दोन्ही थोर व्यक्तींना माझे शतशः प्रणाम. डॉक्टर विठ्ठल प्रभू यांनी आपल्या कारकीर्दीत लिहिलेली पुस्तके व समुपदेशनाचे धडे ,प्रत्येकांच्याजीवनात नक्कीच उपयोगी पडले आहेत,यापुढेही पडतील . ईश्वर चरणी माझी एकच प्रार्थना ,त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. त्यांच्या संपर्कात राहून मला मिळालेली गुरुकिल्ली, मी माझ्या ,पुढच्या आयुष्यात त्याचा वापर करून ,माझेच नव्हे ,तर माझ्या संपर्कात आलेल्यांचे ही, जीवन सुखमय आणि आनंददायी करेन.
डॉक्टरांची ऋणी,
संपदा भंडारकर.
No comments:
Post a Comment