म्हातारपणी भारतातच का रहावं
अमेरिकेला पाच महीने राहिल्यानंतर मनात आलेले विचार सहज पणे लिहावे असं वाटलं
यात कोणाला काही सल्ले देण्याचा हेतू नाही
आमचे पाच महीने मजेत गेले पण कायम परदेशात रहायची वेळ आली तर काय? या संबंधी विचारांच वादळ उठलं.
आमच्या किटी गृपमधे " म्हातारपणी मुलांकडे जाऊन रहावं" असा विचार मांडला गेला. मग परत नटसम्राट हे संपूर्ण नाटक आठवलं. हे नाटक म्हणजे काही फक्त कल्पना विलास नव्हता
तरूणपणी परदेशात जरूर रहावं. भरपूर पैसे कमवावेत. पण साठी सत्तरीनंतर कुठे रहावं ?
नटसम्राट या नाटकाचा माझ्यावर खूप प्रभाव आहे. या नाटकात तरूण आणि वृद्ध असं द्वंद्व आहे. हे नाटक मी तरूणपणी पाहीलं तेव्हा मला तरूणांचच बरोबर असतं असं वाटलं, आणि आता मी लवकरच 58 होईन तेव्हा पण मला तरूणांचच बरोबर असतं असं आजही वाटतंय. त्यामुळे असा प्रश्न मनात येतो की म्हातारपण काढण्यासाठी कोणता देश चांगला? मी जरी अजून " तसा" म्हातारा झालो नसलो, तरी विचार करून ठेवायला काय हरकत आहे?
"ते ( 80 वर्षाचे गृहस्थ) अमेरिकेत असतात सध्या त्यांच्या मुलीकडे" हे भारतात ऐकलं की ऐकणार्या भारतीयाला, ते मरण्यापूर्वीच जणू स्वर्गात गेलेत असा फील येतो. " मोठा माणूस ! " असं तो मनात म्हणतो. पण असं खरंच राहिलंय का ?
एक जमाना होता की भारतात लाल गहू मिळायचा आणि मुंबई पुणे एवढ्या अंतरासाठी कधी कधी दहा तास लागायचे
नर्गीसला उपचारासाठी अमेरिकेत जावं लागायचं. आणि पाऊस पडला की अख्ख्या मुंबईत खड्डे पडायचे.
जुन्या काळात या दुर्व्यवस्थेमुळे म्हातारे काय.... तरुणांना पण भारत नकोसा वाटायचा.
पण आता नाही तसं....भारत बदललाय
म्हातारा माणूस म्हणून लागणार्या आणि भारतात असणार्या सुविधांकडे आता आपण बघुया.
दैनंदिन सुविधा
जमाना बदलला. Express ways आले
Foreign च्या गाड्या आल्या. Superspeciality hospitals आली
ओला उबर झोमॅटो स्विगी डंझो अमेझाॅन
झेप्टो गीपे अरबन कंपनी वगैरेनी भारताचा स्वर्ग बनवला आहे. बटन दाबलं की काही क्षणात तुम्हाला आपण ठाकूर असल्याचा भास होतो, आणि गाववाले तुमची सेवा करून लुप्त होतात. अगदी माफक दरात.
वस्तू नाही आवडली की परत घ्यायला दारात हजर.
अमेरिकेत अजूनही Door delivery नाही.
असलीच तर फारच महाग असते.
वस्तू आणायला जावी लागते. फर्नीचर स्वतः assemble करावं लागतं. शिवाय वस्तू परत करायची असेल तर गाडी काढून एका विशिष्ट पत्यावर वस्तू देऊन यावी लागते.
तुमची गाडी तुम्हालाच धुवावी लागते, कपड्याना इस्त्री स्वतःच करावी लागते. घराची साफसफाई स्वैपाकानंतरची भांडी तुम्हालाच घासावी लागतात. अगदी एक कप चहा सुद्धा आयता मिळत नाही. तरूण पणी हे ठीक आहे पण म्हातारपणी असं काम होईल का ? तरूण पणी आपण काम करतो कारण म्हातारपणी आराम करता यावा म्हणून. मग आता म्हातारपणी सुद्धा काम काम आणि काम ?
प्रवासी सुविधा
अमेरिकेची थंडी बघितली आणि वसंत ग्रीष्म हे ॠतू पण बघितले. भारतात 365 दिवसांपैकी 360 दिवस तरी हवा उबदार असते. बाहेर जाण्यासाठी कोणतीही नैसर्गिक विपदा वगैरे नसते. Occasional driver मागवून, ओला, उबर, रिक्षा वगैरेने सहज प्रवास करता येतो. हे मी खूप वय झालेल्या किंवा driving न येणार्यांसाठी लिहीत आहे. परदेशात हीच गोष्ट dependency निर्माण करते. बर्याच ठिकाणी public transport नसतो. मग घरात अडकून राहिल्यासारखं वाटू शकतं. प्रचंड थंडी असल्यामुळे घरात कपड्यांचा एक लेयर, घराबाहेर पडताना चार लेयर, परत गाडीत दोन लेयर आणि उतरताना चार लेयर असे सोपस्कार करत बसावं लागत. तरूणपणी याची चटकन सवय होते, पण म्हातारपणी movement स्लो होतात. आणि त्याचा त्रास होतो. थंडीचे सात महिने बाहेर वाॅक वगैरे करता येत नाही. घरात सोय नसेल तर शरीराला चालतं ठेवण्यासाठी असलेला किमान व्यायाम कसा करणार ? भारतात धुळीने भरलेले रस्ते आहेत, किचाट आहे, गर्दी आहे, घाणेरड्या सवयी असलेले लोक आहेत. पण सगळा भारत काही घाणेरडा नाही...हे सहन करणं शक्य नाही का ? तेवढे एरियाज टाळणं शक्य नाही का ?
आरोग्याच्या तक्रारी
भारतात X ray, sonography वगैरे OPD सुविधा सहज accessible असतात. त्यासाठी पर Dr वगैरेचं prescription लागत नाही. पुन्हा त्याचे result normal असतील तर ते लगेच कळतं. " सगळं काही नाॅर्मल आहे" असं तो technician च आपल्याला सांगतो. रिपोर्ट हातात ठेवतो. अमेरिकेत specialist च्या उरावर परत डाॅलर घालून तुम्हाला तुम्ही नाॅर्मल असल्याचं ऐकाव लागतं.
भारतात दर तीन वर्षानी माफक दरात फुल्ल चेहेकप करता येतो. अमेरिकेत दाढ भरायला कमीत कमी हजार डॉलर खर्च येतो.
यावरून इतर रोगांचा अंदाज करा. कॅनडा यूकेत वगैरे फ्री मेडिकल system आहे । पण आपल्याच भारतियानी ती abuse केली आहे त्यामुळे आता ती अतिशय निकृष्ठ आहे.
साठीनंतर अशी बरीच औषधं जी OTC नसतात पण भारतात ती फार्मसी मधे ओळखीवर मिळतात. भारतात पुन्हा पुन्हा त्याच निदानासाठी आणि prescription साठी स्पेशालिस्ट च्या उरावर शेकडो डाॅलर घालावे लागत नाही. त्यामुळे जीवन सुसह्य होतं. कधी कधी आपल्यालाच माहीत असतं की आपल्याला विशेष काही झालेलं नाही. काही औषध केमिस्टकडून आणून पटकन बर होता येतं. याउलट अमेरिकेत तुम्हाला तडफडत रहावं लागतं.
US मधे प्रिस्क्रिप्शन शिवाय औषधं मिळत नाहीत.
Appointment शिवाय डॉक्टर भेटत नाही
Appointment लगेच मिळत नाही
आणि अगदी मरायला टेकल्याशिवाय emergency मधे घेत नाहीत. औषधं तर प्रचंड महाग अगदी डाॅलर ला रुपया समजलात तरी. परावलंबी झाल्यावर भारतात माणूस ठेवणं जास्त स्वस्त नाही का ?
उदरभरण
भारतात मनुष्यबळ सहज उपलब्ध आहे. एकटं असणार्या म्हातार्यांसाठी वेगवेगळे फूड options आहेत. स्वैपाकाला माणूस ठेवण्यापासून डबा आणण्यापर्यंत सोई आहेत. एखाद्या बाईला जरी स्वैपाकाची खूप आवड असली, तरी कधीतरी आयतं जेवायला द्यावं असं वाटतं. अमेरिकेत ते कसं करणार ? घरपोच काही मिळत नाही. घरगुती अन्न आणायचं तरी स्वतः गाडी काढून घ्यायला जावं लागतं
अर्थार्जन
कोणी कितीही उच्च पदस्थ म्हणून रिटायर झाला तरी जर developed country मधे उर्वरीत आयुष्य काढायचं असेल तर नोकरी ही करावीच लागते. डबोल्यावर दिवस काढता येत नाहीत. परदेशातील बहुसंख्य देशात आता retirement age 67 ते 69 आहे. त्याशिवाय पेन्शन मिळत नाही
मला वाटतं हा एक अमानुष प्रकार आहे. नोकरीमुळे माणसाला जीवनात मोकळा वेळ मिळालेला नसतो. जो रिटायरमेंट नंतर मिळतो. काही माणसं मुश्किलीने सत्तरी गाठतात आणि लुडकतात, मग या लोकानी काय नोकरी करता करताच देह ठेवायचा का ?
एकटेपणा
अमेरिकेत पाचपाचशे घरं असलेल्या कम्युनिटींमधे चिटपाखरू रस्त्यावर दिसत नाही. आज माझ्या नातीला मी खिडकीत उभं राहिलो तरी चालणारी पमपम दाखवू शकत नाही, पक्षी दाखवू शकत नाही, अर्ध्या तासाने एक गाडी येते. एखादा पक्षी दिसतो. अशा ठिकाणी म्हातारा माणूस बोअर होणार नाही का?. माझे सत्तरी पूर्वी खूप अबोल असलेले आजोबा, सत्तरीनंतर खूप बोलू लागले होते. त्यांच्या तरूणपणच्या खूप गोष्टी ते परत परत सांगत असत. पण परदेशात म्हातार्यांना श्रोता कोण ? आणि केवळ मुलं जवळ आहेत म्हणून हा एकटेपणा सहन करायचा का ?
स्पेशल सहायक साठी किती $ मोजायचे ?
बघा विचार करा.
तुमचे विचार तुम्ही मांडाल अशी अपेक्षा आहे. क्रमशः
No comments:
Post a Comment